कन्नड संघटनांचे लाडके आणि मराठी जनांना नेहमीच त्रास दिलेले जिल्हाधिकारी एन जयराम यांची बदली झाली आणि आता या पदासाठी पुन्हा लॉबिंग सुरू झाले आहे.यामुळे नवा जिल्हाधिकारी कोण याकडे लक्ष लागून राहिले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव झालेले माजी पालकमंत्री सतीश जर्किहोळी हे पुन्हा जयराम यांनाच आणण्यासाठी प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडे त्यांनी आपले वजन वापरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
त्यांचेच बंधू आणि सध्याचे पालकमंत्री रमेश जर्किहोळी यांनी जयराम यांना परत आणण्यास विरोध केला आहे. त्यांना कर्नाटक कॅडर चे अधिकारी बोमनहळ्ळी यांना बेळगावला आणायचे आहे, त्यांनीही यासाठी मुख्यमंत्र्यांकडे यासाठी जोर लावला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दोघांचेही न ऐकता माजी जी प सीईओ गौतम बगादी किंवा हवेरीचे जिल्हाधिकारी वेंकटेश यांच्या नावांचा विचार सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आहे.
जयराम आणि बोमनहळ्ळी हे प्रोमोटेड आयएएस अधिकारी आहेत. तर बगादी आणि वेंकटेश हे थेट आयएएस आहेत. सध्या निवडणूक तोंडावर असताना आपल्या विश्वासातील अधिकारी असावा यासाठी काँग्रेस प्रयत्नात आहे. सध्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार जिल्हा पंचायत सी ई ओ रामचंद्रन यांच्याकडे आहे.