काही लोक फारच मत्सरी असतात. आपल्यापेक्षा दुसर्याकडे काही जास्त असले की या लोकांचा जळफळाट होतो. कोणाचे काहीही चांगले या लोकांना बघवत नाही. हे लोक सतत दुसर्याची उणीदुणी काढत राहतात. एकत्र कुटुंबात राहणार्या व्यक्तींमध्ये या गोष्टी प्रकर्षाने आढळतात. हे लोक सतत माझे तुझे करत राहतात. तुसडेपणाने बोलणे, टोमणे मारणे, समोरच्या व्यक्तीच्या मनाला लागेल असे बोलण्यामध्ये या लोकांनी प्रावीण्य मिळवलेले असते. सतत आपल्या आजूबाजूला असणार्या लोकांचा व्देष हे लोक करत असतात. त्यामुळे ते स्वतः कधीही आनंदी राहू शकत नाहीत. राग तर या लोकांच्या नाकावर टिच्चून असतो. पटकन चिडणे हे यांचे प्रमुख लक्षण. त्यांना राग अनावर होतो आणि अशा रागाच्या भरात हे लोक तर्हेवाईक विचित्र वागतात आणि दुसरे मोठे लक्षण म्हणजे संशयीपणा!
या व्यक्तींचा कुणावरही विश्वास नसतो. त्यांच्या मनाला संशयाच्या भुताने पछाडलेले असते. नवर्याला बायकोविषयी, बायकोला नवर्याविषयी सतत संशय येत असतो. त्यामुळे त्यांचे संसार कधीही सुखाचे होऊ शकत नाहीत. त्यांच्या मनात सूड घेण्याचे वेड असते. अगदी जुन्या गोष्टीसुध्दा हे लोक विसरत नाहीत. आपल्याला कधी त्या व्यक्तीचा सूड घेता येईल याची वाटच पहात असतात. सूड कसा घेता येइल याचे प्लॅनिंग त्यांच्या डोक्यात सतत चालू असते. अनेकवेळा हे प्लॅनिंग मनातच राहते पण प्लॅनिंग मात्र चालूच राहते. भांडण उकरून काढणे त्यांच्या रक्तातच असते म्हणा ना!
आमच्याकडे एक गृहस्थ आपल्या पत्नीला घेऊन यायचे. रीतसर अपॉईंटमेंट घेऊनच यायचे. पण आतला पेशंट बाहेर यायच्या आतच त्यांचा बाहेर ओरडा चालू व्हायचा. तेवढाही धीर त्यांना धरवत नसे. आपण आलो की लगेच आपल्याला डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे अशी त्यांची भूमिका असायची.
कितीही व्यवस्थित नंबर सिस्टीम केली तरी वेळेवर आत येणारा रूग्ण वेळेतच बाहेर पडेल याची शाश्वती नाही. होमिओपॅथीला हिस्टरी लागते म्हटल्यावर, रूग्णांनी कशाकशाची हिस्टरी सांगावी? असो. तर हे गृहस्थ! नेहमी रिसेप्शनिस्ट तक्रार करत. तुम्ही मलाच मुद्दम ताटकळत ठेवता! त्यांच्या पत्नी मात्र सारवासारव करीत राहणार! हे परफेक्ट उदाहरण, पत्नी नाही तर त्यांचा पती… आजच्या लेखाचा ही व्यक्ती गरज पडली तर वार्याशीसुध्दा भांडण काढेल! त्यांची पत्नी दरवेळी हेच सांगणार. ’यांच्या स्वभावाला काही औषध आहे का हो?’ ती खरोखरच आहे! होमिओपॅथी व पुष्पौषधीव्दारे ते शक्य आहे.
काही लहान मुलेदेखील अशाच स्वभावाची असतात. त्यांना त्याचे अन्य मित्रमैत्रिण मनातून आवडत नसतात. एरवी खेळतील. पण आपल्यापेक्षा वरचढ यांना कोणी नको असते अशा लहान मुलांच्या जीवनात मग लहान भाऊ किंवा लहान बहीण सामील झाली तर त्यांना त्या बाळाचा फार मत्सर वाटू लागतो. अनेकवेळा ही मुले त्या लहान बाळाला मारणे, चिमटे काढणे, रडवणे असे उद्योग करू लागतात. वयात आलेली मुले- मुलीसुध्दा अशा सिंड्रोममध्ये जातात. अशा मुलांना आई वडील कुटुंबीय अगदी तुच्छ वाटू लागतात. तिरस्कार करणे, चिडणे, रूसणे ही नित्याचीच बाब ठरते, अशाची समजूत घालताच येत नाही. समजावले तर या व्यक्ती जास्त चिडतात.
अशा लोकांना शारीरिक स्तरावर अनेक विकार होतात. पित्ताचे विकार, अल्सर, कोलायटीस असे पोटाचे विकार तर तणावामुळे उद्भवलेली डोकेदुखी, मणक्यांचे विकार, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार, जोरात श्वास घ्यावा लागणे किंवा श्वास अपुरा पडणे, अर्धशीशी असे विकार या वृत्तीच्या लोकांना होतात. रागीटवृत्ती, मत्सरीवृत्ती, संशयीपणा, सूडबुध्दी यासारख्या नकारात्मक वृत्ती घालवून जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची स्वच्छंदी आनंदी वृत्ती निर्माण करण्यासाठी होमिओपॅथी व पुष्पौषधी उपयुक्त आहेत.
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 08312431362
सरनोबत क्लिनिक 08312431364