१३जुलै २०१६.अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ‘कोपर्डी’ गावातील ती मन विषण्ण करणारी घटना.एका भगिनींवर केलेला अमानुष अत्याचार आणि मानवतेला काळिमा फासणारी हत्या. आणि मग सुरु झाला तो आजवरच्या ५७ मराठा क्रांती मोर्च्यांचा प्रवास. आजवरचे सगळे गर्दीचे उच्चाक मोडणारा ऐतिहासिक, शिस्तबद्ध, एकाच ठरलेल्या आचारसंहिते वर चालणारा, आबालवृद्ध, राजकीय, सामाजिक, विद्यार्थीं,उद्योजक, नोकरदार, शेतकरी, कामगार जवळजवळ समाजातील प्रत्येक घटकांची मोळी बांधून युवतींनी नेतृत्व केलेला मराठा क्रांती मूक मोर्चा. खऱ्याखुऱ्या “मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा” या संकल्पनेला सिद्ध करणारा मराठा क्रांती मोर्चा.
आजवरचे सगळेच भ्रम या मोर्चानी मोडीत काढले. सुरवातीला कोपर्डीच्या भगिनींवरच्या अत्याचाराची बातमी तितकीशी प्रथितयश प्रसार माध्यमांनी मग तो प्रिंट असो वा इलेकट्रोनिक मीडिया यांनी मनावर घेतली नाही.बातमी पसरली ती सोशल मीडियामुळे. ज्यांना न्यायाची चाड होती, झालेल्या अन्यायाची चीड होती, ज्यांच्या मनात असंतोष खदखदत होता ती तरुण मंडळी थेट कोपर्डीत पोहचली त्यांनी ग्राउंड झिरो रिपोर्ट सोशल मीडियावर दिला. त्याच बरोबरीनं औरंगाबातेंत पहिला मराठी क्रांती मोर्चा निघाला.मनात उद्रेक असताना देखील अतिशय शांततेत आणि शिस्तबद्धतेने. ना कोणती घोषणा. ना कोणाला शिवीगाळ. ना कुठल्याही मालमत्तेची नासधूस. नेतृत्व केलं ते युवतींनी.
जस जस मोर्च्याचे लोण पसरायला सुरवात झाली तशी तशी मराठा समाजातील जाणीव तीव्र होत गेली. बदललेल्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीमुळे नाही म्हंटल तरी मराठा समाजात एक प्रकारची अस्वस्थता होती त्या अस्वस्थेला जोड मिळाली मराठा क्रांती मोर्चाची. मराठा समाजाने अस्वस्थ व्हायला अनेक कारणे आहेत प्रामुख्याने बघायचे झाल्यास सगळ्यात जास्त आत्महत्या ग्रस्त शेतकरी मराठा समाजातले, बेभरवशाच्या पीक पाण्यामुळे आर्थिक स्तर खालावलेला, आरक्षणाचा कोणताही फायदा न मिळाल्यामुळे मर्यादित शिक्षण आणि मर्यादित नोकरीच्या संधी त्यात आपल्या असहाय भगिनींवर काही नराधम अत्याचार करतात आणि त्यावेळी त्या भगिनीला न्याय मिळेल का हि साशंकता. अशा वेळी मराठा पेटून न उठेल तर नवल. पण यावेळी ‘महाराष्ट्रातील मराठा’ भारतीय संविधानाला साक्षी ठेऊन कायद्याला मान देऊन मोर्च्याच्या माध्यमातून संघटित होऊन लोकशाही पद्धतीने आणि अहिंसक मार्गाने पेटला.
विचारपूर्वक बघितलं तर ‘आरक्षण’ सोडल्यास कोणतीही मागणी निव्वळ ‘मराठा’ समाजापुरती मर्यादित न्हवती.महिला अत्याचारावर कठोर कारवाई, कोपार्डी पीडितेला न्याय, शेतकऱयांच्या पिकाला हमी भाव, स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी,जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी व कायद्याचा गैरवापर टाळणे. पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मोर्चात आणि एक मागणी प्रामुख्याने आली ‘सीमाप्रश्नाची सोडवणूक’. जिथं जिथं अन्याय वाटला तिथं तिथं “मराठा क्रांती मोर्चानी’ भूमिका घेतली. त्यामुळे समाजाच्या सर्वस्तरातून न भूतो भविष्यती पाठींबा मिळायला लागला. मुसलमान समाज स्वतःहून पुढं आला मोर्च्याच्या नियोजनासाठी.हे काही तरी वेगळं घडत होतं.
मोर्चाला ‘गालबोट’ लागावे यासाठी देखील प्रयन्त झाले पण मोर्च्यानं आपला ‘विवेकवाद’ कधीही सोडला नाही. उदाहरण दाखल सांगायचे झाल्यास, पुण्यातील मोर्चा आधी एका अहमदनगर भागात एका दलित तरुणाची हत्या वैयक्तीक कारणामुळे व्हटकर पाटील या धनगर समाजाकडून झाली त्याच खापर मराठा क्रांती मोर्चावर फोडण्याचा प्रयन्त झाला पण तातडीने जबादार व्यक्तीकडून याची दखल घेऊन सत्य समाजापुढे आणले गेले. मोर्चात ‘समान नागरी कायद्यांचे’ पत्रक वाटण्याचा प्रयन्त हाणून पाडण्यात आला . काही ठिकाणी ‘मोर्च्याच्या’ स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या त्या समाजबांधवांना हा मोर्चा ‘निषेधाचा’ हे सांगून कमानी उतरविण्यात आल्या. थोड्या ठिकाणी ‘राजकीय व्यक्तींनी’ मोर्च्यात पुढे येण्याचा प्रयन्त केला त्यांना विनंती करून मोर्च्याच्या शेवटी सामील होण्याच्या सूचना झाल्या. युवतींचे निवेदन आणि महिलांचे नेतृत्व यात कुठं हि खंड पडला नाही. मोर्च्यानं काटेकोरपणे आपली ‘आचारसंहिता’ जपली आणि जगासमोर आले मराठ्यांचे एक वेगळे शांत, संयमी आणि धीरगंभीर रूप.
आता ९ ऑगस्टला मुंबईत आहे शेवटचा ‘मराठा क्रांती मोर्चा’.हा मोर्चा ‘सरकार’च्या विरोधात आहे आणि राहून राहून वाटते कि सरकार मोर्च्याच्या माध्यमातून होणाऱ्या मागण्यांकडे सकारात्मकरित्या बघत नाही .सरकारच धोरण वेळकाढूपणाचे आहे. सरकारची भूमिका ठाम नाही. ५७ मोर्च्याच्या माध्यमातून सरकारला निवेदन पोहचले आहे. आता त्यावर ‘निर्णयाची’ वेळ आहे. आताशा सरकारनी ‘चर्चेची’ नवी टूम काढली. ठीक आहे चर्चेतून प्रश्न सुटतात करा चर्चा पण मोर्चाला सामोरे येऊन दिवसाउजेडी ‘लाईव्ह’ चर्चा करा. सरकारची ठोस भूमिका बघायला सकल मराठा समाज उत्सुक आहे. आता यात फाटे फोडायचे प्रयन्त करू नका. न जाणो शेतकर्या सारखा उद्या “मराठा संपावर गेला तर ???”
आर्टिकल सौजन्य
अमित शिवाजीराव देसाई