बेळगावचे तीनवेळा नशिबाने झालेले आणि काहीच प्रभाव पाडू न शकलेले खासदार सुरेश अंगडी हे सध्या दोन्हीही बाजूंनी कात्रीत अडकलेत. संघाला खुश करण्याच्या नादात लिंगायत नागनूर मठाच्या स्वामींना त्यांनी मशीद उभारण्याचा सल्ला दिला. याचवेळी मराठे आणि लिंगायत दोघेही काँग्रेस च्या पाठिंब्यावर नाचत आहेत असा आरोपही केला यामुळे प्रत्यक्ष मोदी जरी प्रचाराला आले तरी ते निवडून येणे अशक्य बनले आहे.
पहिल्यांदा वाजपेयी यांच्या लाटेवर ते निवडून आले. दुसऱ्यांदा त्याच लाटेत त्यांचा विजय झाला, तिसऱ्यांदा मोदींची लाट त्यांना तारून गेली. एक खासदार म्हणून काहीच करून न दाखवता सलग विजय आणि खासदार पदाची माळ गळ्यात पडल्याने ते आता तिरपटल्यासारखे वागत आहेत, मात्र यावेळी लिंगायत मठाधिशांना चुकीचे शहाणपण सांगण्याचा मोह त्यांना अडचणीत आणणार हे नक्की आहे.
अंगडी तसे बरळण्यात हुशार आहेत. शिवाजी महाराज लिंगायत होते, किंवा तत्कालीन
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील हेबट आहेत असे म्हणून त्यांनी वाद ओढवून घेतला होता. आता तर नुसता, वादच नव्हे तर प्रचंड नाराजीचा डोंगरच त्यांनी ओढवून घेतला आहे, याचा फायदा दुसरेच कोणी घेण्याची शक्यता मोठी वाटते.
नागनूर मठाचे सिद्धराम स्वामीजी यांना लिंगायत समाजात मोठे महत्व आहे. त्यांच्या शब्दाला मान आहे. लिंगायत स्वतंत्र धर्माच्या लढाईत त्यांनी आघाडी घेतली आहे. स्वतः लिंगायत असलेल्या अंगडींनी राष्ट्रीय आणि पक्षीय धोरणानुसार स्वतंत्र धर्माला विरोध केला तर काही झाले नसते. मात्र त्यांनी स्वामींना असा चुकीचा सल्ला द्यायला नको होता , हा आगावपणा त्यांना अडचणीत आणणार आहे.