कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तानाजी पाटील यांच्याविरोधात चंद्रकांत कोंडुसकर यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने रद्द केली. पाटील यांच्याविरोधात कोंडुसकर साक्षी, पुरावे दाखल करू शकले नाहीत. मंगळवारी (ता. 4) न्यायालयाने हा निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तानाजी पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक लढविली. या निवडणुकीत चंद्रकांत कोंडुसकर हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. शेतकरी संघटनेतर्फे त्यांनी निवडणूक लढविली.
या निवडणुकीत ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. कोंडुसकर यांच्या आई याआधी बेळगाव मतदार संघातून विजयी झाल्या होत्या. त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपाध्यक्षाही होत्या. त्यांच्या जागेवर चंद्रकांत कोंडुसकर निवडणूक लढवत होते. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या लढतीत तानाजी पाटील यांनी चंद्रकांत कोंडुसकर यांचा आठ मतांनी पराभव केला. पण, कोंडुसकर यांनी पाटील यांनी मृत मतदारांच्या नावाने मतदान झाले. बोगस मतदान झाले, असा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याचिकेसाठी तीन तारिखा झाल्या. पण, साक्षी, पुरावे सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने चुकीच्या याचिका सादरीकरणामुळे (डीसमीस फॉर नॉन प्रॉसेकुशन) ती रद्द केली. ऍड. एस. आनंद यांनी तानाजी पाटील यांच्या बाजुने काम पाहिले. तानाजी पाटील यांच्यावरील आरोप न्यायालयाने रद्द केल्यामुळे बेळगाव मतदार संघातील शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.