Saturday, April 27, 2024

/

कोड म्हणजे काय? कसा होतो आणि त्यावरील उपचार पद्धती- वाचा सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

Dr sonali sarnobat

कोड म्हणजे काय?

बऱ्याच व्यक्तींच्या त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे फिकट किंवा पांढरट डाग दिसतात. यातील बरेच डाग हे कोडाचे नसतात. मग कोडाचे डाग कसे ओळखायचे? जन्मानंतर कुठल्याही कारणाशिवाय त्वचेवर वेगवेगळ्या आकाराचे व मापाचे पांढरे शुभ्र डाग अचानक दिसायला लागले तर ते कोडाचे डाग असू शकतात. पण याची तज्ञाकडून खात्री करुन घ्यावी. कोडाचे डाग हे शरीरावर कुठेही होऊ शकतात. कधी ते झपाट्याने वाढून पूर्ण शरीरभर पसरतात तर कधी अगदी हळूवार गतीने वाढतात तर कधी सुरुवातीला उठलेला डाग उपचार करेपर्यंत आहे तसाच रहातो!
कोडाचे विविध प्रकार
कोडाचे स्थिर व अस्थिर असे दोन मुख्य प्रकार आहेत. स्थिर म्हणजे डाग कमी-जास्त होत नाहीत व अस्थिर म्हणजे डाग वाढतच जातात किंवा काही डाग जातात तर काही नवीन येतात.
१.ह्या प्रकारामध्ये ओठ, बोटांची टोके, कान अशा शरीराच्या दूरच्या अवयावर पांढरे डाग दिसतात.
२. या प्रकारामध्ये एका हातावर किंवा पायावर एका रेषेमध्ये पांढरे डाग दिसतात किंवा पाठीवर-पोटावर आडवा पट्टा दिसतो.
३.या  मध्ये एकच पांढरा चट्टा उमटतो व तसाच वर्षानुवर्षे रहातो. कोड हे बहुधा शरीराच्या दोन्ही भागावर सारख्या प्रमाणात दिसते. काही डागामधील केसही पांढरे झालेले दिसतात.
४. शरीराचा बराचसा भाग पांढऱ्या डागाने व्यापलेला असतो.

 belgaum

कोड का व कसा होतो?
कोड हा हजारो वर्षे जुना असा त्वचारोग आहे. आपल्या त्वचेमध्ये मेलॅनोसाईट नावाचा रंग तयार करणाऱ्या पेशी असतात. या पेशी मेलॅनीन नावाचा रंग तयार करतात व त्यामुळे आपल्या त्वचेवर रंग दिसतो. निग्रो जमातीच्या (आफ्रिकन) व्यक्तींमध्ये मेलॅनीन भरपूर असल्यामुळे त्या व्यक्ती काळ्या कुट्ट दिसतात तर युरोप-अमेरिका वगैरे देशामधील व्यक्तींमध्ये या पेशी अत्यल्प असल्यामुळे या व्यक्ती गोऱ्यापान दिसतात.
काही व्यक्तींमध्ये कुठल्यातरी अज्ञान कारणामुळे  त्वचेच्या या पेशींना मारणाऱ्या अॅंटीबाॅडी  तयार होतात व त्या मेलॅनीनच्या पेशींना निष्क्रिय किंवा नष्ट करतात. ज्या जागेवर ही प्रक्रिया होते त्या जागेवर पांढरा चट्टा उमटतो. ज्याला आपण कोड म्हणतो. 15 ते 20 टक्के व्यक्तींमध्ये कोड अनुवंशिक असतो. मधुमेह, पॅनक्रिया चे आजार यामध्ये कोडाचे प्रमाण थोडे जास्त असते.

कोडावरील उपचार
कोड असलेल्या व्यक्तीला कोडाविषयी पूर्ण व शास्त्रशुध्द माहिती देणे ही सर्वात महत्वाची पायरी आहे.
कोड असलेल्या व्यक्तीचे वय, लिंग, कोड कुठल्या भागावर आहे, कोड किती प्रमाणात आहे, चट्ट्यामधील केस पांढरे आहेत की काळे, या सर्व बाबींचा विचार करणे ही दुसरी पायरी!
सर्व प्रकारच्या चाचण्या  वगैरे करणे ही तिसरी पायरी.
समुपदेशन ही चौथी पायरी यामध्ये विविध प्रकारच्या उपचार पध्दती त्याचे फायदे, तोटे, उपचाराला अवधी याविषयी रुग्ण आणि नातेवाईक यांच्याशी चर्चा करणे आवश्यक आहे.
प्रत्यक्ष उपचार ही पाचवी पायरी

1) एक-दोन छोटे चट्टे असल्यास सोरॅलिन घटक असलेले मलम किंवा लोशन किंवा स्टिरॉईडचे क्रिम लावणे किंवा चट्ट्यामध्ये स्टिरॉईडचे इंजेक्शन देणे. 2) चट्टे जास्त असल्यास तोंडावाटे औषधे द्यावी लागतात.
2) होमिओपॅथी  ही सर्वात प्रभावी उपचार पध्दती आहे. शिवाय  दुसरी ही प्रभावी आहे. यामध्ये अति नील किरणांचा उपयोग केला जातो. ज्यायोगे मेलॅनोसाईटस्‌ उत्तेजित होऊन रंग तयार होतो. 3) काही वेळा नवीन चट्टे फार येत असल्यास स्टिरॉइडच्या गोळ्या किंवा इंजेक्शन वापरावी लागतात. 4) त्वचारोपण ही शस्त्रक्रिया अतिशय प्रभावी आहे. पण याचा उपयोग फक्त स्थिर कोडामध्येच होतो. 5) या शिवाय प्रायोगिक तत्वावर लेसर, प्लॅस्टिक सर्जरी  वगैरे उपचार पध्दती विचाराधीन आहेत. 6) काही वेळा पांढऱ्या डागामध्ये गोंदणासारखा रंग भरणे, त्वचेच्या रंगासारख्या  सारख्या दीर्घकाळ टिकणाऱ्या पावडरचा उपयोग करावा लागतो.
कोडाविषयी समज-गैरसमज
तसं पाहिलं तर कोड हा काही आजार नाही. कारण त्यामुळे कुठलाही त्रास होत नाही किंवा जीवालाही धोका होत नाही. तरीसुध्दा कोड हा एक भयंकर असा सामाजिक आजार आहे. कोड असलेल्या मुला-मुलींचे लग्न होणे किती अवघड असते हे त्या कुटुंबालाच ज्ञात असते. त्या कुटुंबावरच हा कलंक लावला जातो.
ज्या व्यक्तीला कोड आहे अशी व्यक्ती आपल्यामध्ये भयंकर असा आजार आहे, या न्यूनगंडातून वावरत असतात. त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढळलेला असतो. हे सर्व विसरून कर्तृत्व करून दाखविल्यास समाज नक्कीच या व्यक्तींना मानवंदना देईल. जगामधील कितीतरी थोर व्यक्तींना कोड असतो. भारताचा क्रिकेटपटू एकनाथ सोलकर याने विश्वविक्रम करून दाखविला होता!
भारतीय समाजात कोडाच्या संदर्भात अनेक गैरसमज आहेत. देवाच्या करणीमुळे किंवा अनुवंशिकतेने कोड येतो, असा गैरसमज समाजात आहे. काही भोंदू बुवा आणि देवऋषी, मांत्रिक-तांत्रिक कोड असलेल्या लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना याबाबत वाटेल ते सांगतात. कुलदैवताचा किंवा अन्य कोणत्या तरी देवाचा कोप झाल्यामुळे हे सारे संकट कोसळल्याची भीती घालतात. मंत्र-तंत्र आणि धार्मिक उपचारामुळे कोड बरा होईल, असा सल्ला देतात. त्यासाठी प्रचंड पैसे उकळतात. काही वैदू झाड पाल्यांची औषधे देतात. पण त्याचा काही एक उपयोग होत नाही. कोडावर वैद्यकीय उपचार करुन घेणे हाच सर्वात योग्य असा मार्ग आहे. ग्रामीण भागात तर कोडाच्या संदर्भात खूपच भीती आणि गैरसमज आहेत. सामाजिक प्रबोधनाने या  रोगाचे हे गैरसमज दूर केले पाहिजेत. कोड असलेल्या व्यक्तीला सतत भीती वाटत असते. आपणाला असाध्य रोग झाला, अशा मनोगंडाने त्याला पछाडलेले असते. पण हा त्वचारोग आहे, त्याचे शास्त्रीय कारण आहे, हे त्याला वैद्यकीय तज्ञांनी व्यवस्थित समजावून-पटवून दिले पाहिजे. विशेषत: मुलींच्याबाबतीत कोडाचा त्रास खूपच होतो. अशा मुलींचे विवाह जमणे खूपच अवघड जाते. काही वेळा तर, पूर्वजांनी केलेल्या पापामुळे या पिढीत हा रोग आल्याचा अपप्रचारही समाजात केला जातो. अशा मुलींचे आयुष्यही बरबाद झाल्याची उदाहरणे भारतात आहेत. काही वेळा तिशी-चाळीशीनंतरही या कोडाची लक्षणे दिसायला लागतात. पण हा तसा असाध्य असा रोग नाही. त्यावर वैद्यकीय उपचार आहेत. आपल्या घरातल्या मुलांस-मुलीस कोड झाले असल्यास त्याच्या आई-वडिलांनी वेळीच त्वचारोग तज्ञांना दाखवून त्यावर वैद्यकीय उपचार करून घेतल्यास, या कोडाचा प्रसार थांबू शकतो. मंगळाची मुलगी, तशीच कोडाची मुलगी, म्हणजे कुटुंबाला शाप! असा आक्रोश करुन काहीही उपयोग नाही. मांत्रिक-तांत्रिकाकडेही जाऊन उपयोग नाही. ज्या व्यक्तीला कोड असतो त्यांनी आपण अन्य माणसांपेक्षा वेगळे आहोत, असा समज मुळीच करून घेऊ नये. हा त्वचा रोग आहे, हे समजून घ्यावे. या कोडामुळे बुध्दिमत्ता आणि अन्य दैनंदिन जीवनावर काहीही परिणाम होत नाही. अशा व्यक्तींची बुध्दीमत्ता हे अन्य व्यक्तीप्रमाणेच असते. पण कोड म्हणजे महाभयंकर रोग! असा समज भारतीय समाजात अंधश्रध्दा आणि रुढी परंपरातून निर्माण झाला आणि तो कायम राहिला, ही दुर्दैवाची बाब होय! अगदी सुशिक्षित माणसेही गंडे आणि धुपाऱ्याचा मार्ग या कोड निवारणासाठी स्वीकारतात, हे योग्य नाही. कोड असलेल्या माणसांनी यशाची गौरी शंकरे जिंकलेली आहेत, हे लक्षात घेऊन आपण सर्वच जण या कोडाची कीड दूर करुया व कोडग्रासितांना योग्य दिशा दाखवून कोडमुक्त करूया!

होमियोपॅथिक उपचार पहिल्या स्टेज मधे नक्कीच उपयुक्त असतात.

DR SONALI SARNOBAT
DR SARNOBAT CLINIC AND RESEARCH CENTER
GOAVES
AMAR EMPIRE
BELGAUM-11
0831-2431362
0831-2431364

3 COMMENTS

  1. जबरदस्त आर्टिकल। समाजातील एका गंम्भीर आजाराबाबत आपण जागृती केलीत … खूप नविन माहिती आपण सांगितलीत .. आपले मनापासून धन्यवाद ।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.