अतिशय गरिब परिस्थितीत खडतर मेहनत घेऊन बारावी परीक्षेत विज्ञान विभागात ९७.५८ टक्के गुण मिळविलेल्या होनगा येथील शीला केरळकर या विद्यार्थीनीच्या पुढील अभियांत्रिकी शिक्षणाची जबाबदारी केएलएस संचलित जीआयटी कॉलेजने घेतली आहे.
कॉलेजने तिला फ्री सीट दिली आहे. संस्थेने या विषयावर आज विशेष बैठक घेतली. अध्यक्ष एम आर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली, कॉलेज व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष उदय कालकुंद्रीकर आणि प्राचार्य ए एस देशपांडे तसेच इतर सदस्य होते.
शिलाने परिस्थितीमुळे सीईटी परीक्षा दिली नाही, यामुळे तिचे नुकसान होऊ नये म्हणून व्यवस्थापन कोट्यातून तिला मोफत प्रवेश तसेच इंजिनिअर होईतोवर बस प्रवासाबरोबरच इतर सर्व प्रकारचे शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी रात्री बेळगाव live ने शीला ची यशोगाथा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडत पुढील शिक्षणास मदतीच आवाहन केलं होतं यास प्रतिसाद देत विमल फौंडेशन तसेच डॉ सोनाली सरनोबत यांचे नियती फौंडेशन अश्या संस्थानी शीलाचा सत्कार करत शिष्यवृत्ती देऊन आर्थिक मदत केली आहे. बेळगाव live ने शीलाला मदतीचे आवाहन केल्याच्या 24 तासाच्या आत सामाजिक संघटनांनी शीलास मदत करण्यास सुरुवात केली होती.
भाजप नेते किरण जाधव यांनी विमल फौंडेशन च्या वतीने कॉलेज मध्ये जाऊन शीला केरळकर हिचा सत्कार केला .
नियती फौंडेशन ने ही या मदत कार्यात पुढाकार घेऊन तिला मदत मिळवून देण्याची सुरुवात केली, सर्वप्रथम तिला १०००० चा धनादेश देण्यात आला, तिच्या मोफत प्रवेशासाठीही नियतीच्या माध्यमातून डॉ सोनाली सरनोबत आणि प्राचार्य देशपांडे यांनी मोठे प्रयत्न केले आहेत.आतातर नियतीने तिला लागणारे शैक्षणिक साहित्य देण्याची जबाबदारीही घेतली आहे.
बेळगाव live च्या आवाहनाला प्रतिसाद देत झालेल्या या मदतीने शीला च्या एकंदर प्रवासाला सोनेरी किनार मिळाली आहे.
Trending Now