मार्च एण्ड काळात आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी बेळगाव रहदारी पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणार्यांच्या विरोधात कारवाईची जोरदार मोहीम हाती घेतली. केवळ सात दिवसात 2 हजार वाहन धारकांवर कारवाई करताना पोलिसांनी 3 लाख 34 हजार रुपयांचा दंंड वसूल केला आहे.
बेळगाव रहदारी पोलिसांना शहर परिसरात हेल्मेटसक्तीची मोहीम हाती घेतली आहे. चालू आर्थिक वर्षात आपले कारवाई आणि दंड वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी रहदारी पोलिसांनी मार्च महिन्याच्या अखेरीस वाहतुकीचे नियमभंग करणार्यांविरोधात कारवाईचा धडाकाच लावला.
गेल्या सप्ताहभराच्या काळात शहरातील उभा मारुती कॅम्प, किल्ला अशोक चौक, आरटीओ संगोळी रायण्णा चौक, केएलई मार्ग, गोगटे चौक, काँग्रेस रोड, सीबीटी चौक, या ठिकाणी विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. रहदारी पोलिसांनी शहराच्या दोन्ही उत्तर आणि दक्षिण भागात कारवाईची मोहीम सातत्याने सुरू ठेवली.
रहदारी पोलिसांनी केवळ 7 दिवसांत विविध प्रकारे वाहतुकीचे नियम भंग करणार्या 2 हजार वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईअंतर्गत 3 लाख 34 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
त्याचबरोबर अवैध वाळू वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करताना 82 हजार तर बेकायदेशीर मद्य वाहतूक करणार्या वाहनांविरोधात कारवाई करताना 3 लाख 72 हजार रुपये दंड वसूल केला.
रहदारी पोलिसांनी इअर एण्ड टार्गेट पूर्ण करण्यासाठी हाती घेतलेली कारवाईची मोहीम पुढेही सुरू ठेवल्यास बेफाम वाहने हाकणारे, रहदारी नियमांचा भंग करणार्यांच्या वाढत्या कारवायांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.