सुजित मूळगुंद हे नाव ऐकले की अनेक भ्रष्ट माणसांना अंगावर काटा येतो.कारण हे व्यक्तिमत्वच तसे आहे. जात भाषा पंत आणि धर्म असा कोणताही भेद न मानता साऱ्यांशीच ते आपलेपणाने राहतात. त्यांचा भ्रष्टाचार मुक्तीचा लढा सुरु आहे. अश्या हे सुजित मुळगुंद यांना बेळगाव live चा आठवड्याचा माणूस हा मान मिळाला आहे.
सुजित यांचे बालपण तसे कष्टात गेले.
वडील लवकर निवर्तल्याने त्यांच्यावर घराची जबाबदारी लवकर पडली. सुरुवातीपासूनच लढाऊ बाणा तयार होण्यासाठी त्यांना आर एस एस ची पार्श्वभूमी कारणीभूत ठरली. सुजित लहानपणापासूनच शाखेत जायचे, तेथूनच पुढे ते भाजपच्या मुख्य प्रवाहात आले, मात्र स्वतःच्या आणि बाहेरच्या पक्षातील काही भ्रष्ट मंडळींचा कारभार त्यांना पटला नाही, यामुळे त्यांनी भ्रष्टाचार निर्मुलन परिवार या संघटनेची स्थापना केली, या संघटनेची व्याप्ती आणि प्रामाणिक कार्याच्या जोरावर पुढे ते कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि दलित वर्गाच्या संघटनांमध्येही रुजू झाले व मदतीचा वसा सुरूच ठेवला.
स्वतः कन्नड भाषिक असूनही ते मराठी द्वेष्टे नाहीत हे विशेष. कन्नड माणसासाठी ते जितक्या त्वरेने धावून जातात तितक्याच पॉट तिडिकीने मराठी माणसासाठीही धावतात यामुळेच साऱ्यांना आपला वाटणारा एक कार्यकर्ता ही त्यांची ओळख आहे.
सत्तेवर असतांना भरमसाठ संपत्ती मिळविलेल्या एका माजी आमदाराला शड्डू ठोकल्याने सुजित विशेषत्वाने चर्चेत आले, त्या व्यक्तीवर दावा दाखल करून पाठपुरावा करताना मध्यंतरी चुकीच्या गुन्ह्यात गोवले जाण्याचा प्रकारही त्यांना सोसावा लागला, मात्र अशा परिस्थितीतही स्वतःचे ब्रीद जपत त्यांचे कार्य सुरू आहे. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली असून ते सामान्य माणसास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात अन्याया विरोधातली चालती फिरती हेल्पलाईन ते आपल्या कार्यामुळे बनले आहेत.भ्रष्टाचार आणि अन्याय करणाऱ्या सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी कडे सुजित हे नाव ऐकलं तर नक्कीच धडकी भरते अशी इमेज बनली आहे ती केवळ त्यांच्या कार्यामुळेच…
या त्यांच्या कार्यासाठी बेळगाव live चा त्यांना सलाम