साऱ्या बेळगावचा आवाज असलेले आणि साऱ्या बेळगावचे मामा म्हणून ओळखले जाणारे तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक तसेच लोकमान्य या संस्थेची स्थापना करून गोरगरिबांसाठी एक नवा आधार ठरलेले किरण ठाकूर यांचा आज वाढदिवस. त्यांच्या कार्याचा झपाटा आणि त्यांनी निर्माण केलेली समृद्धी यांचा वेध घेऊन बेळगाव live ने त्यांना या आठवड्याचा माणूस मध्ये स्थान दिले आहे.
सर्वप्रथम किरण ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्यसेनानी बाबुराव आणि माई ठाकूर यांच्या पोटी जन्म घेऊन आपल्या माता पित्यांचा वैचारिक वारसा जपत आपली वाटचाल त्यांनी सुरु ठेवली आहे. त्यांच्याबद्दल किती बोलावे आणि काय काय सांगावे हा प्रश्न नक्कीच पडतो.
प्रत्येक बेलगावकरांचा ते आवाज आहेत, गोव्यात सरकार ठरविण्याची ताकत ते ठेवतात, महाराष्ट्रात त्यांचे वजन आहे आणि कोकणात त्यांचे मोठे चाहते आहेत. ही मोठी ओळख त्यांनी जनसंपर्क, कामाचा झपाटा आणि दुरदृष्टीच्या जोरावर तयार केली आहे.
सीमाप्रश्नाचा बुलंद आवाज ही त्यांची प्रमुख ओळख. तरुण भारत च्या माध्यमातून लोकशिक्षण, समाज प्रबोधन आणि अन्यायाविरुद्ध झुंज ही तत्वे पाळताना ठाकूर यांनी सीमाप्रश्न एकहाती जिवंत ठेवला आहे.ठाकूर आणि तरुण भारत नसते तर हा प्रश्न केंव्हाच संपला असता हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. आजही त्यांच्या जीवनाचे प्रमुख ध्येय सीमाप्रश्नाची सोडवणूक हेच आहे.
आर्थिक साबल्य आल्याशिवाय काहीच साध्य होत नाही हे ओळखून ९० च्या दशकात त्यांनी लोकमान्य सोसायटी स्थापन केली, आज या सोसायटीचे जाळे इतके मोठे झाले आहे की भले भले अचंबित होतात, यामागे ठाकूर यांचे नियोजनबद्ध कार्य आणि सतत कामात राहण्याची प्रवृत्ती महत्वाची ठरते.
मामा सतत फिरत असतात, छत्रपती शिवराय त्यांचे आदर्श आहेत. सकाळचा चहा बेळगावात, दुपारी कोल्हापुरात, सायंकाळी पुण्यात मुंबईत किंवा दिल्लीत हे त्यांनाच जमू शकते.गोवा हे तर त्यांचे जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. अधून मधून अभ्यासाच्या निमित्ताने ते विदेश दौऱ्यावर जातात.तेथे पाहिलेले इथे अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. स्पष्टपणे एकाद्याचा समाचार घेतात.
आणि कौतुक करताना कसलीही कसर राहू नये याची ते काळजी घेतात, यामुळेच ग्रेट ठरतात.
शेतकऱ्यांचा ते आधार आहेत, दुर्बल आणि महिलांचे कैवारी आहेत, जांबोटी भागात गावेच्या गावे दत्तक घेऊन ते राबताहेत, उत्कृष्ट लेखक पत्रकार संपादक आणि वक्ते आहेत. सहकारितेत त्यांचा आदर्श आहे, त्यांच्या कार्याला बेळगाव live चा सलाम. त्यांच्या मार्गदर्शनातून बेळगाव ची कीर्ती सर्वदूर पोहचत राहिलंच, त्यांना शुभेच्छा.