Monday, December 30, 2024

/

हृदयविकार-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

 belgaum

dr. sonali sarnobatधमन्यांमध्ये अडथळे तयार होण्याची कारणं, कोलेस्टेरॉल,हृदयधमनीची दुखापत आणि रक्तातील गुठळ्या, बेताल हृदयस्पंदन, हृदयधमनीला आकुंचनाचा झटका म्हणजे हृदयधमन्यांच्या विकारामुळे होणारा हृदयविकार.

आपलं हृदय हे छातीच्या पिंज-यात , मध्यभागी किंचित डाव्या बाजूला सरकलेलं असतं हे आता बहुतेक सर्वांना माहिती आहे. शरीरासाठी रक्त पुरवण्याचं म्हणजेच रक्त ‘पंप’ करण्याचं काम हृदय करतं. तसंच, स्वत:च्या पोषणासाठीही हृदय रक्त पंप करत असतं. प्राणवायू हे हृदयाचं अन्न आहे आणि ते रक्तातून पुरवलं जातं. जोपर्यंत पुरेसं रक्त हृदयाकडं जात असतं तोपर्यंत हृदयाचं काम सुरळीत चालू असतं. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या असं म्हणतात. या हृदय धमन्यांच काम सुरळीत चालू असतं. तोपर्यंत त्यातून रक्ताचा पुरेसा पुरवठा होत राहतो आणि हृदयाचं कामही सुरळीत चालू राहतं. काही कारणानं हा रक्तपुरवठा अपुरा पडू लागला तर छाती, मान, पाठ, हात यापैकी एका किंवा अनेक ठिकाणी वेदना होऊ लागतात आणि त्याल अंजायना पेक्टोरीस (Angina Pectoris) असं म्हणतात.

जर काही कारणानं हृदयाला होणारा रक्तपुरवठा पूर्ण बंद पडला किंवा फार मोठ्या प्रमाणात बंद पडला तर झटक्यानं हृदय बंद पडतं. त्याला हृदयविकाराचा झटका असं म्हणतात.

तीन प्रमुख धमन्यांमधून हृदयाला रक्त पुरवल जातं. उजव्या हृदयधमनीतून हृदयाच्या उजव्या बाजूला रक्तपुरवठा होतो, तर डाव्या बाजूला रक्तपुरवठा करण्यासाठी दोन धमन्या असतात. पुढची डावी उतरती धमनी ही हृदयाच्या पुढच्या बाजूला रक्त पुरवते आणि वळसा घेऊन पाठीमागे जाणारी हृदयधमनी ही हृदयाच्या मागच्या बाजूला रक्तपुरवठा करते. या प्रमुख हृदयधमन्यांना पुढे अनेक फाटे फुटतात आणि ते सर्व हृदयाला रक्तपुरवठा करतात. यापैकी एखाद्या धमनीत काही अडथळा निर्माण झाला तर तिच्यातून वाहणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि हृदयाला रक्त अपुरं पडू लागतं.

या धमन्यांमधून होणा-या रक्तपुरवठ्यात अडथळा कशामुळे येऊ शकतो?
हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची शवचिकित्सा केल्यावर त्यांच्यापैकी बहुतेकांच्या हृदयधमन्यांमध्ये अडथळे असल्याचं आढळून येतं. (या अडथळ्यांना प्लाक – Plaque, ऍथेरोस्क्लेरॉसिस – Athero Sclerosis, किंवा आर्टिरिओ स्क्लेरॉसिस – Arteri Osclerosis असं म्हणतात) हे अडथळे हे छातीत दुखण्याचं. हृदयाला रक्त कमी पडण्याचं आणि हृदयविकाराच्या झटक्याचं मुख्य कारण असलं पाहिजे असा निष्कर्ष यावरून काढला गेला. गेल्या ५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत हृदयाविषयीचं वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान हे शवविच्छेदनातून मिळालेलं होतं. कारण जिवंतपणी हृदयाचं निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी आवश्यक ती साधनं त्या काळापर्यंत उपलब्ध नव्हती.
कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, धूम्रपान, इतर उत्तेजक पदार्थ, स्थूलत्व आणि बैठी जीवनशैली, आनुवंशिकता, मधुमेह, मानसिक ताण, मानसिक एकटेपणा हे सर्व हृदयविकाराच्या द्रुष्टीने धोक्याचे घटक आहेत.

हृदयधमनीविकाराला (आणि त्यामुळे होणा-या हृदयविकाराला) कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत होतात ते आपण पाहिलं. हृदयविकार टाळायचा असला तर कोलेस्टेरॉलची पातळी, धमनीच्या अस्तराला होणारी दुखापत, धमनीला येणारे पेटके आणि रक्तात तयार होणाऱ्या गुठळ्या या गोष्टी नियंत्रणात हव्यात. तेव्हा या गोष्टींवर परिणाम करणारे, त्यांना कारणीभूत ठरणारे घटक म्हणजेच धोक्याचे घटक कोणते असतात ते आपण पाहू या.

कोलेस्टेरॉल
आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं. आणि यकृताची ही क्षमता ब-याच अंशी आनुवंशिक असते. त्यामुळे काही लोकांची कोलेस्टेरॉल पातळी त्यांनी कितीही संपृक्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ले तरी फारशी वाढलेली आढळत नाही. तर याउलट काही लोकांच्या आहारात संपृक्त चरबीचा फारसा भाग नसतानासुध्दा त्यांची कोलेस्टेरॉलची पातळी वाढत गेलेली दिसते. अशा लोकांच्या दृष्टीनं आहारातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणं फारच आवश्यक असतं. आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी प्रमाणात ठेवायची असली तर आहारातून कोलेस्टेरॉल न खाणं किंवा कमीत कमी खाणं हा एक त्याचा मार्ग आहे. कोलेस्टेरॉलच्या दोन प्रकारांपैकी रक्तामधील कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असणं आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी असणं हेही फार आवश्यक असतं. आपल्या आहारातील काही पदार्थामधून आपल्याला थेट कोलेस्टेरॉलच मिळत असतं. उदा. अंड्यातला पिवळा बलक. हा बलक जवळ जवळ संपूर्ण कोलेस्टेरॉलचा बनलेला असतो. तसचं लोणी, साय, चीज (Cheese), तूप इ. पदार्थांमधून आपल्याला कोलेस्टेरॉल आणि संपृक्त चरबी मिळते जिचं रूपांतर पुढे Cholesterol मध्ये होतं. कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवायची असली तर हे पदार्थ आहारातून गाळणं आवश्यक आहे.

आपल्या आहारातील तेल, तूप, लोणी या आणि अशा स्निग्ध पदार्थापैकी कोणते संपृक्त चरबीचे आहेत हे बघण्याचा साधा मार्ग म्हणजे हे पदार्थ किती तापमानाला गोठतात, ते बघावं. सर्वसाधारण तापमानाला म्हणजे हे पदार्थ किती तापमानाला जे पदार्थ घट्ट होतात ते संपृक्त चरबीचे असतात असं म्हणायला हरकत नाही. आपल्या रोजच्या स्वयंपाकातलं शेंगदाणा तेल, करडईच तेल किंवा सोयाबीन तेल ही आणि अशी वनस्पतिजन्य तेल घरातल्या तापमानात द्रवस्थितीत असतात. आणि ती असंपृक्त चरबीची असतात. पण पामतेल व खोबरेल तेल यांच्यात मात्र बऱ्याच प्रमाणात संपृक्त चरबी असते.

उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाबाखाली वाहणारं रक्तं हे अधिक दाबाखाली वाहात असल्यामुळे धमनीच्या भिंतीवर अधिक जोरात धडका देतं आणि त्यामुळे धमनीच्या भिंतींना इजा पोचण्याची शक्यता असते. अशी इजा पोहचली की त्या ठिकाणी कोलेस्टेरॉलचा थर साचून अडथळा तयार होऊ लागतो.

अडथळा तयार झाल्यामुळे धमनी चिंचोळी होते, ती चिंचोळी झाल्यामुळे, रक्तप्रवाहाला मिळणारी वाट कमी झाल्यामुळे, रक्तप्रवाहाचा दाब आणखी वाढतो आणि ते आणखी जोरानं भिंतीवर धडका देऊ लागतं. असं एक दुष्टचक्र उच्च रक्तदाबामुळे सुरू होतं.
धूम्रपान: धूम्रपान य विषयावर जगभर आज इतकं संशोधन चालू आहे आणि झालेलं आहे की धूम्रपान आपल्या आरोग्याला अपायकारक असतं हे सर्वांनाच माहीत आहे. धूम्रपानामुळे श्वसनसंस्थेचे रोग होण्याची तसंच फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचीही शक्यता असते हेही आज ब-याच लोकांना माहीत आहे.

फारशी माहीत नसलेली गोष्ट आहे ती ही की धूम्रपानामुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरपेक्षाही हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. धूम्रपान न करणा-यापेक्षा धूम्रपान करणा-यांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण २-३ पटींनी जास्त असतं. धूम्रपानातले हानिकारक घटक म्हणजे निकोटिन आणि कार्बन-मोनॉक्साईड. निकोटिन हे विषारीच असतं. कीटकनाशक म्हणून त्याचा वापरही केला जातो. त्यामुळे विडीकिंवा सिगरेटमधून तंबाखू ओढल्यानं हानिकारक असं निकोटिन आपल्या शरीरात जाईल यात विशेष ते काही नाही. बिडी किंवा सिगरेट ओढायला लागल्यानंतर निकोटिन आणि कार्बन – मोनॉक्साईड हे पदार्थ रक्तात शोषले जातात. रक्तातल्या निकोटिनमुळे धमनीतल्या आतल्या अस्तराला इजा पोहोचू शकते. तर कार्बन – मोनॉक्साईड रक्तातल्या हिमोग्लोबिनशी संयोग पावतं आणि त्यामुळे प्राणवायुचं रक्तातलं प्रमाण कमी होतं. निकोटिन हे व्यसन बनतं. म्हणजे त्याच्या अमलाखाली मेंदूतला एक भाग ताणाखाली असल्यासारखा प्रतिक्रिया करू लागतो. ताणाला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या ऍड्रिनॅलिन (Adrenaline) सारखी हार्मोन्स (Hormones) रक्तात सोडली जातात. धमन्या आकुंचन पावतात. हृदय जास्त जोरानं स्पंदन पावू लागतं आणि रक्त अधिक चिकट बनून गुठळी तयार होण्याची शक्यता वाढू लागते. रक्तदाबही तात्पुरता वाढतो. नेमका त्याच वेळेला कार्बन-मोनॉक्साईडशी संयोग पावून रक्तातील प्राणवायू कमी झालेला असल्यामुळे जेव्हा अधिक प्राणवायुची गरज असते तेव्हाच नेमका प्राणवायुचा पुरवठा कमी पडू लागतो आणि ऍन्जायनाचा किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. हे सगळं टाळायचं असेल तर निकोटिन टाळणं म्हणजे धूम्रपान न करणं आणि करत असल्यास बंद करणं आवश्यक ठरतं. तोंडावाटे तंबाखू खाल्ल्याचे दुष्परिणामही धूम्रपानासारखेच असतात. निकोटिन हा काही आपल्या अन्नाचा आवश्यक भाग नाही. एवढंच नाही तर तो पोषकही नाही, उलट हानिकारक आहे. हृदयविकाराच्या दृष्टीनं सुध्दा निकोटिन आहारातून वर्ज्य करणं अतिशय आवश्यक आहे.

इतर उत्तेजक पदार्थ: ब्राउन शुगर, कोकेन, मार्फिन, हेरॉइन अशा वेगवेगळ्या नावांनी चोरटेपणानं विकल्या जाणा-या पदार्थांना ‘ड्रग्ज’ या एका सर्वसमावेशक नावानं हल्ली ओळखल जातं. ‘ड्रग्ज’ या शब्दाचा मूळ अर्थ औषध असा असला तरी एखादी व्यक्ती ‘ड्रग्ज’ घेते असं कोणी म्हणालं तर त्याचा अर्थ ती व्यक्ती औषध घेते असा होत नाही हे आपल्याला माहीत असतं. चटकन व्यसन लावणा-या, आरोग्याला अतिशय अपायकारक असलेल्या आणि बेकायदेशीररीत्या चोरटेपणानं विकल्या जाणा-या कोकेनसारख्या पदार्थांना ड्रग्ज म्हटलं जातं. हे पदार्थ हृदयविकाराच्या दृष्टीनं अतिशय वाईट असतात. रक्ताच्या गुठळ्या तयार होणं, किटणातून रक्तस्त्राव होणं आणिहृ हृदयधमन्या आकुंचन पावणं या सगळ्या प्रक्रिया घडून येण्यात या उत्तेजक पदार्थांचा फार मोठा हात असू शकतो. या पदार्थांच्या सेवनामुळे अनुकंपी चेतासंस्था (Sympathetic Nervous System) उत्तेजित होते आणि ऍड्रिनॅलिन व इतर हार्मोन्सची रक्तातील पातळी भराभर वाढत जाते. ड्रग्ज घेणा-या व्यक्तीला खूप छान वाटू लागतं. पण ही अवस्था थोडाच काळ टिकते. आणि मग अतिशय उदास, निरूत्साही, निराश वाटू लागतं. या अवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे परत ड्रग्ज घेणं. अशा रीतीनं ड्रग्ज घेण्याचं व्यसन अतिशय लवकर लागतं. आणि एकदा लागलेलं व्यसन सुटता सुटत नाही. ड्रग्जच्या वाढत्या व्यसनाबरोबरच हृदयविकाराचा, हृदयझटक्याचा धोकाही वाढत जातो.
स्थूलत्व आणि बैठी जीवनशैली: लठ्ठपणा आणि फारसे शारीरिक श्रम करावे न लागणारी दैनंदिन राहणी असलेली जीवनशैली या गोष्टींचाही हृदयविकार होण्यात वाटा असतो. अशा लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण इतरांपेक्षा जास्त असल्यांचं आढळून येतं.

हृदयविकाराच्या दृष्टीनं आणखी काही धोकादायक असे घटक आहेत की ज्यांच्यावर आपलं काहीही नियंत्रण असू शकत नाही. उदा. लिंग, वय, आनुवंशिकता, मधुमेह.
लिंग आणि वय: हृदयविकारानं मृत्यू येण्याचं प्रमाण ६५ वर्षांनंतर पुष्कळ जास्त असलं तरी एकूण मृत्यूंपैकी १/३ मृत्यू ६५ वर्षांपूर्वीच झालेले असतात. त्यातही हृदयविकारानं मृत्यू होण्याचं प्रमाण पुरूषांमध्ये जास्त आहे. असं आढळून आलेलं आहे की ३५ ते ४४ वर्षांच्या वयानंतर मात्र हे प्रमाण जवळ-जवळ सारखंच असतं. मेनोपॉज पूर्वी (म्हणजे मासिक पाळी बंद होण्यापूर्वी) स्त्रियांच्या रक्तात चांगल्या कोलेस्टेरॉलचं म्हणजे HDL Cholesterol चं प्रमाण जास्त असत, आणि त्यामुळे बहुधा त्यांचा हृदयविकार कमी होत असावा.
आनुवंशिकता: आपल्या रोजच्या आहारातून किती कोलेस्टेरॉल तयार होतं हे आपल्या यकृताच्या कामगिरीवर अवलंबून असतं. काही लोकांना आनुवंशिकत:च या दृष्टीनं कार्यक्षम असं यकृत मिळालेलं असतं तर काही लोकांचं यकृत पुरेसं सक्षम नसतं. या बाबतही आपल्या हातात करण्याजोगं काहीच नसतं.
मधुमेह:हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येण्याचं प्रमाण मधुमेहींच्यामध्ये इतर लोकांपेक्षा जास्त असतं. विशेषत: लहान वयात ज्यांना मधुमेह झालेला असतो त्यांच्या मध्ये हे प्रमाण वाढलेलं आढळून येतं. मधुमेह हा ब-याच वेळा आनुवंशिक असतो. त्यामुळे तो टाळता येत नाही. पण योग्य आहार, व्यायाम यांसारख्या गोष्टींनी तो आटोक्यात मात्र ठेवता येतो. हृदअपु-या याला होणारा रक्तपुरवठा हृदयधमनीविकारामुळे कमी झालेला असला की हृदयविकार होतो आणि काही कारणानं तो पूर्णपणे बंद पडला किंवा बराच काळ अपुऱ्या प्रमाणात सुरू राहिला तर हृदयविकाराचा झटका येतो हे आपण पाहिलं.

हृदयधमनी विकारात हृदयधमन्यांमध्ये अडथळे निर्माण झालेले असतात आणि त्यामुळे त्या चिंचोळ्या होऊन रक्ताचा प्रवाह कमी झालेला असतो. याशिवाय काही वेळेला अडथळ्यांमधून रक्तस्त्राव होऊन रक्ताच्या गुठळ्या प्रवाहात येतात आणि चिंचोळ्या भागात त्या अडकून बसून रक्तपुरवठा बंद पडतो. पण कधी कधी खुद्द हृदयधमनीलाच पेटका येऊन ती एकदम चिंचोळी होते आणि अशा तात्पुरत्या चिंचोळ्या झालेल्या धमनीतही अडथळ्याच्या ठिकाणी रक्तप्रवाह पूर्णपणे बंद पडून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणजे, हृदयविकाराला (कार्डिऍक हार्ट डिसीजच) कारणीभूत कोण? तर हृदयधमनी विकार आणि हृदयधमनी विकाराला कारणीभूत असलेल्या गोष्टी म्हणजे एकतर कोलेस्टेरॉलचं धमनीच्या आतल्या भागावर बसणारं किटण (याला कारण म्हणजे रक्तातील कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी), दुसरं म्हणजे हृदयधमन्यांना येणारे पेटके, आणि तिसरं म्हणजे हृदयधमनीतील अडथळ्यांमधून रक्तस्त्राव होऊन बाहेर सुटणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या. या तिन्ही गोष्टींना कारणीभूत असणाऱ्या बाबी म्हणजे, वाढीव कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, निकोटिन असलेल्या पदार्थांचं सेवन, वाढतं वय, आनुवंशिकता, आहार, मधुमेह अशा असतात हे आपण पाहिलं. यापैकी काही बाबींवर आपलं नियंत्रण असूच शकत नाही हे खरं असलं तरी काही बाबी मात्र आपण प्रयत्नानी आटोक्यात ठेवू शकतो. शिवाय या सगळ्या घटकांच्या जोडीला आणखी दोन घटक बरेच महत्त्वाचे असल्याचं अलीकडे लक्षात येऊ लागलं आहे. एक म्हणजे मानसिक ताणतणाव आणि दुसरा म्हणजे एकटेपणा किंवा एकाकीपणा.

 

 

डाॅ.सोनाली सरनोबत
लेखिका होमिओपॅथिक तज्ञ आहेत.

सरनोबतस् मल्टीस्पेशालीटी होमिओपॅथी
अमर एंपायर
गोवावेस बेळगाव
09916106896
09964946918

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.