बेळगाव महानगरपालिकेच्या आवारात राज्यातील सर्वाधिक उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. मूर्तिकार संजय किल्लेकर यांनी साकारलेल्या या पुतळ्याचे लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण होणार आहे. हा पुतळा बेळगावसह उत्तर कर्नाटकातील जनतेसाठी लक्षवेधी ठरला आहे.
कर्नाटकातील सर्वात उंच असा हा पुतळा बेळगाव मनपाच्या आवारात उभा करण्यात आला आहे. सुमारे दीड वर्षाच्या कालावधीत बाँझपासून पुतळा तयार करण्यात आला आहे. पुतळ्याचे वजन दोन टन आहे. त्याची उंची 15 फूट आहे. मनपा आवारातील 15 फूट उंचीच्या चौथर्यावर पुतळा बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जमिनीपासून तब्बल तीस फूट उंचीच्या या पुतळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
डॉ. आंबेडकरांनी 1939 साली बेळगाव नगरपरिषदेला भेट दिली होती. त्यावेळी डॉ. आंबेडकर यांचा नगरपरिषदेच्यावतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यांना बेळगावच्या जनतेच्या वतीने मानपत्रही देऊन गौरविण्यात आले होते. रविवारी (दि.9) मिरवणुकीद्वारे पुतळा मनपाच्या आवारातील चौथर्यावर उभा करण्यात आला आहे. लवकरच पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्यासह कर्नाटकातील दिगगज नेते या धम्म पुरुषाच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत