यावर्षी बारावी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. आता मूल्यमापनादरम्यानही सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर असणार आहे. राज्यामध्ये 48 मूल्यमापन केंद्रे असून बुधवारपासून सदर केंद्रांवर मूल्यमापन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यापूर्वी 12 वी परीक्षेचे सीसीटीव्ही कॅमेर्याच्या नजरेखाली मूल्यमापन केले जात नव्हते. आता मात्र याची सक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे. मूल्यमापन करते वेळी नजरचुकीने होणार्या चुका टाळण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मूल्यमापनात होणारा गोंधळ रोखण्यासाठीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काही मूल्यमापन करणारे शिक्षक इतरांकडून मूल्यमापन करून घेत असल्याचा आरोप करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याने ही प्रणाली लागू केली आहे.
यासह मूल्यमापनात पारदर्शकता आणण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण खात्याने बंगळूर, हुबळी, धारवाड, बेळगाव, शिमोगा, म्हैसूर यासह राज्यभरातील 48 मूल्यमापन केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती केली आहे. 12 वीच्या उत्तरपत्रिका संबंधित मूल्यमापन केंद्रातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून वरिष्ठ अधिकार्यांच्या परवानगीनेच मूल्यमापन प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येत आहे. मूल्यमापनासाठी राज्यभरातील 48 परीक्षा केंद्रांमध्ये जवळपास 20 हजारपेक्षा अधिक मूल्यमापकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.