बेळगाव दि ६ :बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रम दुसरे बालपण च्या वतीने प्रथमच समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५ व्यक्तींना सेवाभावी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. बुधवार दि ८ रोजी आश्रमात नव्याने बांधण्यात आलेल्या आश्रयालयाच्या उदघाटन कार्यक्रमात हा गौरव होणार आहे.
रक्तदान आणि देहदानाची जागृती करणारे कार्यकर्ते पुरुषोत्तम पटेल, धाडसी आणि सेवाभावी पोलीस अधिकारी सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी आर गडडेकर, सेवाभावी वकील महेश बिर्जे, पत्रकार सुभानी मुल्ला आणि प्रामाणिक पणे डॉक्टरी पेशा सांभाळणारे डॉ भूषण सुतार आदींचा यामध्ये समावेश असणार आहे.
बुधवार दि ८ रोजी सकाळी १०.३० वाजता हा सोहळा होणार आहे. जीवन विद्या मिशन चे प्रल्हाद वामनराव पै यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन हा गौरव होईल.
तत्पूर्वी कै जी एस चौगुले यांच्या स्मरणार्थ नव्याने बांधण्यात आलेल्या आश्रयालयाचे उदघाटन प्रल्हाद वामनराव पै यांच्या हस्ते होणार असून नव्याने बांधलेल्या भोजनकक्षाचे उदघाटन सिद्धार्थ सुरेश हुंदरे यांच्या हस्ते होणार आहे. पोलीस आयुक्त टी जे कृष्णभट्ट, भरतेश शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी राजीव दोड्डणावर, केएलइ विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्ही डी पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात प्रल्हाद वामनराव पै यांचे शैक्षणिक व जीवन जगण्याची कला याविषयावर व्याख्यान होणार असून दुपारच्या सत्रात विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी केले आहे.