Sunday, January 5, 2025

/

आयुष्य स्त्रीचे ओरबाडण्याचे

 belgaum

होय मी असं म्हणतेय, स्त्रीच्या जन्माला आलेली आणि ओरबाडली गेलेली दुर्दैवी युवती, काय अधिकार असतो हो पुरुषान्ना स्त्रीला ओरबडायचा? स्त्री दिसली की तिला वासनेची शिकार बनवायचा? आज सगळीकडे माझीच चर्चा आहे, बरेच जण बलात्कार करणाऱ्या त्या जनावरांची बाजू घेतायेत म्हणे, घ्या घ्या कारण माझ्या प्रियकरा बरोबर एकांत शोधताना नकळत मी जेथे गेले ते वासनांध जनावरांचे जंगल असेल याची कल्पना नव्हती मला, ती माझी चूकच झाली ना?

डॉक्टर व्हायचं, ज्याला प्रेमाने जवळ केलं त्याच्याशीच संसार करायचा आणि जीवनात पुढे जायचं ही माझीही स्वप्ने होती, तो भेटायला आला होता मला, पुढील आयुष्याच्या शपथा घेत होतो आम्ही, आणि अचानक ती हिंस्र जनावरे दाखल झाली, फक्त प्रेम आणि प्रेमाचे पावित्र्य जपणाऱ्या आम्हाला त्यांनी नग्न व्हायला लावले, मदतीला कोणी नाही आणि जीवाची भीती होतीच, ज्याला पुढे काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे तो मरणाला घाबरतो, तसेच आम्हीही घाबरलो होतो, मग काय घडत गेलं नाही घडवलं गेलं सार काही,

आजही माझ्या अंगावर काटा येतोय, स्त्री म्हणून मिळालेले आणि बटबटीत डोळ्यांसमोर जपून ठेवलेले माझे अवयव असे विखरलेल्या वासनांध नजरांनी विटाळले जात असताना मी आक्रोशत होते, त्याचवेळी भूकंप किंवा सुनामी यावी आणि माझ्यासकट सारे पृथ्वीत गडप व्हावे……. नको तो प्रसंग डोळ्यासमोर, पण तो हटत नाही कारण हा माझा एकटीचा नव्हे तर समस्त स्त्री जातीचा बलात्कार होता.

त्यानंतर ब्लॅकमेलिंग आणि एकामागून एकाने लुटलेली आब्रू, पुन्हा व्हिडिओ व्हायरलच्या धमक्या आणि पैशांची मागणी….. कुठे फेडतील हे पाप ती जनावरे? आपल्या आई बहिणीशी ते असेच वागत असतील का हो? वागत ही असतील, त्यांच्या वासनेच्या विकृती समोर त्यांना नाती दिसली असती तर माझ्यातही त्यांना आपली बहीण दिसली असती, त्यांना ती बघायची नव्हती, त्यांना फक्त लुटायचे होते, फेडायचे होते , ओरबडायचे होते.

हा मी तक्रार एवढ्या उशिरा का केली? अनेक अर्थ निघाले, खरतर मला ती करायचीच नव्हती , जीवन संपवून टाकणार होते मी, कारण संभोग आणि त्यातला शृंगार अनुभवण्यापूर्वीच मी विटवली गेले, लुटले गेले , बरबाद झाले, मग जगून आणि तक्रारी करून काय करू? न्यायालयात पुन्हा बलात्कारित होऊ?
बलात्कार होताना त्यांचे हात तुज्या स्थनावर होते की मांडीवर अश्या प्रश्नांची उत्तरे देऊ? सांगा काय करू मी?

एक तिऱ्हाईत म्हणून बघताना तुम्ही म्हणालात त्या जंगलात मीही तोकडे कपडे घालून प्रियकरासोबत सेक्स करायलाच गेले होते की काय? आमचे प्रेम आहे हो, तितके घाणेरडेपण नाही त्यात, आणि सेक्सच करायचा तर पैसे देऊन बंद खोल्या मिळाल्याच असत्या की, गेले ती चूक , किंवा अगदी सेक्स साठीच गेले म्हणा हवतर, पण यात ती विकृत जनावरे आणि तुमचा काय संबंध? १७ वर्षांच्या मुलीवर अन्याय होतो आणि तुम्ही प्रश्न विचारताना इतके खाली जाता, शेवटी मलाच दोषी धरता?  म्हणूनच करायची नव्हती मला तक्रार, पण करावी लागली, उद्या माज्यासारखीच कोणी अशी भर रस्त्यावर नागडी होऊ नये म्हणून…..

त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, पुढे शिक्षा होईल की निर्दोष ठरतील माहित नाही, पण देवाच्या हा त्याच देवाच्या ज्याचावरचा विश्वास मी काढून टाकलाय, दरबारात त्यांना नक्कीच शिक्षा होईल, ज्या देवाने स्त्री बनवली तोच जर तिला ओरबडणारी जनावरेही बनवत असेल तर का विश्वास ठेवू मी त्याच्यावर? सांगा मला…

मी जगणार आहे.

rape logo

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.