बेळगाव लाईव्ह : बेळगाव विजयपूर आणि धारवाड या जिल्ह्यांचा समावेश करून उत्तर कर्नाटकात डिफेन्स कॉरिडॉर उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मोठ्या आणि मध्यम उद्योग तसेच पायाभूत सुविधा विकास मंत्री एम. बी. पाटील यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तरावेळी सांगितले.
हुबळी–धारवाड पश्चिम मतदारसंघाचे आमदार अरविंद बेल्लद यांच्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, देशातील एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात कर्नाटक राज्याचा 65 टक्के वाटा आहे. राज्य ‘इको स्पेस’ क्षेत्रातही अग्रगण्य मानले जाते.
मुख्यमंत्री आणि आमच्या प्रतिनिधी मंडळाने केंद्र सरकारचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन उत्तर कर्नाटकात डिफेन्स कॉरिडॉर उभारण्याची मागणी केली असून, त्याबाबत त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा द्यावा, अशीही विनंती त्यांनी केली.
देवनहळ्ळी तालुक्यात उभे करण्यासाठी एरोस्पेस पार्कसाठी 13 गावांतील 1,777 एकर जमीन संपादनाची प्रक्रिया मागे घेण्यात आली असून, त्या संपूर्ण भागाला ‘विशेष कृषी क्षेत्र’ म्हणून हिरव्या पट्ट्यात ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव जिल्ह्यात ‘एकस SEZ प्रायव्हेट लिमिटेड’ यांनी आधीच एरोस्पेस घटकांचे SEZ स्थापित केले असून ते यशस्वीपणे चालू आहे. त्यामुळे बेळगावात एरोस्पेस घटक निर्मितीचे इकोसिस्टम विकसित झाले आहे आणि येथे गुंतवणुकीची मोठी क्षमता आहे, असे पाटील म्हणाले.
बेंगळुरू–मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत धारवाड जिल्ह्यात सुमारे 3,000 एकर औद्योगिक क्षेत्र विकसित केले जात असून, तेथे एरोस्पेस घटक उत्पादनासाठी आवश्यक जमीन व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच उत्तर कर्नाटकात याच क्षेत्रातील उद्योग उभारू इच्छिणाऱ्यांना आकर्षक सवलती व प्रोत्साहन दिले जाईल.
नवीन औद्योगिक धोरणांतर्गत नंजुंडप्पा अहवालानुसार ‘अतिहिंडलेले तालुके’ म्हणून जाहीर झालेल्या भागात उद्योग उभारणाऱ्यांना 3 ते 5 टक्के अतिरिक्त विशेष सहाय्य दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.




