यासाठी मध्यवर्ती कडून मराठी जनतेचे आभार

0
542
Mes logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशन विरोधात आयोजित केलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाला हडपशाहीला झुगारत मराठी भाषिकांनी विरोध केल्याबद्दल मराठी भाषिकांच्या एकजुटी बद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचे आभार मानले आहेत.

दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येत होते. या महामेळाव्यासंबंधी पोलीस खाते व प्रशासन यांच्याकडे परवानगीसाठी रितसर अर्ज करण्यात आला होता. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मेळावा कोठे घेण्यात येईल, यासाठी काही ठिकाणे देण्यात आली होती. या ठिकाणांपैकी एका ठिकाणी परवानगी द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली होती.

या संदर्भातील पत्रानुसार पोलीस खात्याबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. या बैठकीतील चर्चेनुसार मेळावा वॅक्सीन डेपो येथे घेण्याचे ठरले होते. या मेळाव्यासाठी बेळगाव आणि परिसरातील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन वॅक्सीन डेपोकडे येण्यास सुरुवात केली. मात्र, वॅक्सिन डेपोच्या चारही बाजूंनी पोलिसांनी रस्ते बंद केले. सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तेथे येणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अटक करून एपीएमसी येथील रयत भवनात ठेवण्यात आले. अनेक कार्यकर्त्यांना माघारी जाण्याची विनंती करून पोलिसांनी दडपशाहीने मेळावा होऊ दिला नाही.

 belgaum

तथापि, रयत भवन येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी सभेचे आयोजन करून मराठी भाषिकांचा निर्धार व्यक्त केला. या सभेत कर्नाटक सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यात आला तसेच सीमा प्रदेशाचा महाराष्ट्रात समावेश करावा, भाषिक अल्पसंख्यांकांचे अधिकार त्यांना मिळावेत, केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारने भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या विनंतीनुसार काय कारवाई केली ते जाहीर करावे, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर खोटे खटले दाखल करण्याचे थांबवावे, अशा ठरावांना मंजुरी देण्यात आली.

या मेळाव्यासाठी अटक झालेल्या, मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे व नागरिकांचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष, बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर येथील पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात येत आहेत. अशीच एकजूट पुढील आंदोलनातही मराठी जनतेने कायम ठेवावी आणि मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी सदैव सिद्ध राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.