बेळगाव लाईव्ह :यंदा 2025 च्या हिवाळी वेळापत्रकातील हवाई संपर्कात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी बेळगाव देखील सज्ज असून इंडिगोने 26 ऑक्टोबर 2025 पासून एक मुंबई आणि दुसरी हैदराबाद अशी दोन नवीन दैनंदिन थेट उड्डाणे जाहीर केली आहेत. दैनंदिन दिल्ली सेवा सुरू ठेवण्यासह या जोडण्यामुळे बेळगाव विमानतळाचे (आयएक्सजी) नेटवर्क लक्षणीयरीत्या मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. तथापि, इंडिगोच्या चालू ऑपरेशनल अर्थात कामकाज आव्हानांमुळे आता हे नवीन संपर्क वेळेवर प्रारंभ होण्याच्या बाबतीत अनिश्चितता निर्माण होऊ शकते.
गेल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आणि डीजीसीएच्या सुधारित उड्डाण कर्तव्य वेळ मर्यादेशी (एफडीटीएल) जुळवून घेण्यात अडचणींमुळे इंडिगो प्रमुख विमानतळांवर मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द करत आहे. आपण कामकाज तात्पुरते कमी करणार असल्याचे इंडिगो एअरलाइनने विमानचालन नियामकला (एव्हिएशन रेग्युलेटर) कळवले आहे. तथापी 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत परिस्थिती पूर्णपणे सामान्य होण्याची अपेक्षा असून तोपर्यंत उड्डाण रद्दीकरण आणि वेळापत्रकातील व्यत्यय सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
बेळगावबाबत इंडिगोकडून कोणताही अधिकृत संदेश आलेला नसला तरी, विमान वाहतूक निरीक्षकांच्या मते जेंव्हा विमान कंपन्या मोठ्या प्रमाणात वेळापत्रक पुनर्रचना करतात, तेंव्हा नवीन किंवा अलीकडेच सुरू झालेल्या मार्गांना विलंब किंवा तात्पुरते निलंबन सहन करावे लागते. सध्याची परिस्थिती पाहता तज्ञांचा असा विश्वास आहे की नेटवर्क स्थिर होईपर्यंत नवीन दैनिक बेळगाव -मुंबई आणि बेळगाव -हैदराबाद उड्डाणांना विलंब किंवा विसंगत ऑपरेशन्सचा सामना करावा लागू शकतो.


सध्या, बेळगाव त्याच्या दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, जयपूर आणि अहमदाबाद या 6 प्रमुख गंतव्यस्थानांशी जोडलेले आहे. तथापी इंडिगो एका आव्हानात्मक टप्प्यातून जात असल्याने प्रवाशांना अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जर इंडिगो लवकर आपले कामकाज (ऑपरेशन्स) स्थिर करण्यात यशस्वी झाली, तर दोन नवीन उड्डाणे अजूनही नियोजना प्रमाणे सुरू होऊ शकतात. दरम्यान, इंडिगोने पूर्णपणे सामान्य ऑपरेशन्स पुनर्संचयित केल्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये आयएक्सजी -एनएमआय (बेळगाव -नवी मुंबई) फ्लाइटची घोषणा केली जाऊ शकते, असेही सूत्रांनी सूचित केले आहे.



