बेळगाव लाईव्ह : संगमेश्वरनगर, बेळगाव येथे सहा महिन्यापूर्वी झालेल्या आपल्या घरातील सुमारे 75 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी एपीएमसी पोलिसांकडून अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नसल्याबद्दल संगमेश्वरनगर बेळगाव येथील मीना लालचंद चौहान व त्यांचा मुलगा संजयकुमार चौहान यांनी आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
संगमेश्वरनगर बेळगाव येथील मीना लालचंद चौहान व त्यांचा मुलगा संजयकुमार चौहान यांनी आपल्या वकिलांच्या उपस्थितीत आज गुरुवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले.
माझ्या आईच्या सुमारे 75 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांच्या चोरीबाबत 5 जून 2025 रोजी बेळगाव शहरातील एपीएमसी पोलिस ठाण्यामध्ये नोंदवलेल्या एफआयआर क्रमांक 60/2025 च्या तपासात निष्काळजीपणा आणि विलंब केला जात आहे. एफआयआर दाखल होऊन आता 6 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.
तथापि आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही तपासात कोणतीही अर्थपूर्ण प्रगती झालेली नाही. मी आणि माझी आई स्वतः पोलिस ठाण्याला अनेकदा भेट देऊनही प्रत्येक वेळी प्रकरणाला प्राधान्य दिले जात आहे आणि लवकरच ते सोडवले जाईल असे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे. परंतु या आश्वासनांनंतर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी जेंव्हा जेंव्हा बोलावले तेंव्हा आम्ही पूर्ण सहकार्य केले आहे. एवढे करूनही नवीन माहिती किंवा प्रगतीऐवजी आम्हाला खोटी आश्वासने, धमकी आणि विशेषतः माझ्या वृद्ध आईशी अनादरपूर्ण वर्तन करण्यात आले आहे.
एखाद्या गुन्ह्याचा बळी ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकाशी असे वर्तन अस्वीकार्य आणि अमानवी आहे. याव्यतिरिक्त आमचे वकील उदय यांनी बेळगावचे डीसीपी, बेळगावचे पोलिस आयुक्त, बेळगावचे डीसीपी गुन्हे, बेळगावचे डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था बेळगाव आणि एसीपी बेळगाव यांना नोंदणीकृत कायदेशीर नोटीस बजावून देखील औपचारिक वाढीला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, प्रगती झालेली नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणताही संवाद झालेला नाही.
त्यांचे हे मौन पारदर्शकता आणि जबाबदारीबद्दल गंभीर चिंता निर्माण करते आणि प्रकरण सोडवण्याऐवजी दुर्लक्षित करण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूचित करते. यासाठी आमची विनंती आहे की आमच्या घरी झालेल्या चोरीचा त्वरेने छडा लावण्याचे आदेश द्यावेत जेणेकरून माझी आई मीना लालचंद चौहान हिला न्याय मिळेल, अशा आशयाचा तपशील संजयकुमार चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मीना लालचंद चौहान यांनी एपीएमसी पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच घरात कामाला असलेल्या शाहूनगर येथील गंगा राठोड या महिलेने मला झोपेच्या गोळ्या देऊन घरातील दागिने लंपास केले आहेत, असा आरोप केला. तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना तातडीने कार्यवाही करण्याचा आदेश द्यावा आणि मला माझे दागिने परत मिळवून देण्याद्वारे न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मीना चौहान यांनी केली.



