बेळगाव लाईव्ह : गेल्या चार दिवसांपासून बेळगाव शहर परिसरातील शेतवाडीत सलग चोरीच्या आणि आग लावण्याच्या घटना घडत आहेत. येळ्ळूर शिवारातील मोटार वायर चोरी असो किंवा मुतगा शिवारात भाताच्या वळ्यांना आग लावण्याचे प्रकार असोत, अशा घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच सांबरा–आष्टे–बळ्ळारी नाला शिवार परिसरात दोन मोटारी चोरी गेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पोलिसांनी या वाढत्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
सांबरा येथील आष्टा ब्रिजजवळ नाल्याला लावलेल्या दोन पाण्याच्या मोटारी सोमवारी रात्री चोरीस गेल्या. माजी तालुका पंचायत सदस्य काशिनाथ धर्मोजी आणि महादेव हणमंत कोकितकर यांच्या मोटारी चोरीस गेल्या आहेत.
मंगळवारी सकाळी भरमा धर्मोजी मोटार सुरू करण्यासाठी शेतात गेले असता चोरीची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी तत्काळ काशिनाथ धर्मोजी यांना कळवले. त्यानंतर आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी जमा झाले. बातमी समजताच ग्रामपंचायत उपाध्यक्ष आणि सदस्यांनी येऊन पाहणी केली. काशिनाथ धर्मोजी आणि महादेव कोकितकर यांनी मारिहाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
याच वर्षी मार्च महिन्यात सुराप्पा देसाई यांची मोटार चोरी झाली होती. त्यांनीदेखील मारिहाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती; मात्र त्या प्रकरणाचाही तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी वाढत आहे. याशिवाय अनेक वेळा केबल चोरीच्या घटनाही घडत आहेत. त्याकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
शेतात पिकांच्या धान्याच्या गंजी जाळणे, मोटार चोरी, केबल चोरी अशा घटना वारंवार घडत असतील, तर शेतकरी कितीपर्यंत सहन करणार? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.


