बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यात अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. हिरेमुलंगी गावात एका निर्दयी मातेने अवघ्या तीन दिवसांच्या नवजात मुलीचा गळा आवळून खून केला आहे. या मातेला यापूर्वी तीन मुली आहेत आणि केवळ मुलगा हवा या आशेवर मुलगी झाल्याच्या कारणामुळेच तिने हे क्रूर कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
रामदुर्ग तालुक्यातील हिरेमुलंगी गावातील अश्विनी हळकट्टी (२८) हिने हे पाशवी कृत्य केले आहे. या महिलेला यापूर्वी तीन मुली होत्या, त्यामुळे तिला यावेळी मुलगा होण्याची तीव्र अपेक्षा होती. २३ नोव्हेंबर रोजी तिची मुदकवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाली होती.
प्रसूतीच्या दुसऱ्याच दिवशी अश्विनी माहेरच्या घरी हिरेमुलंगी येथे आली. आज सकाळी, कुटुंबातील सदस्य बाहेर गेले असताना आई अश्विनीने आपल्या तीन दिवसांच्या नवजात मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर ‘बाळ श्वास घेत नाहीये’ असा बनाव रचला.
रामदुर्ग येथील सरकारी रुग्णालयात बाळाला तपासणीसाठी आणले असता ही संपूर्ण घटना उघडकीस आली. डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली असता, “नवजात मुलीचा गळा दाबल्यामुळे आणि श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला आहे,” असे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी क्रूर माता अश्विनी हळकट्टी हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच रामदुर्गचे उप-अधीक्षक चिदंबर मडिवाळर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि घटनेचा आढावा घेतला. हा सर्व प्रकार सुरेबान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
नवजात शिशुचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी त्या अश्विनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र तिला अद्याप अटक करण्यात आली नाही. तिची नुकताच प्रसूती झाली आहे त्यामुळे तिची तब्येत कशी आहे याबाबत डॉक्टरांचा देखील सल्ला घेतला जात आहे व्यतिरिक्त तिला तीन लहान मुली आहेत आणि तिला अटक केल्यानंतर त्या लहान बाळांची परिस्थिती काय हा मान्यतेचा दृष्टिकोन समोर ठेवून अद्याप अटक करण्यात आलेली नाही मात्र गुन्हा नोंद झाला आहे आणि याबाबतीत आम्ही अधिक तपास करून डॉक्टरांचा सल्ला घेत आहोत त्यानंतरच तिला अटक केली जाणार आहे अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी दिली आहे.



