बेळगाव लाईव्ह : कर्नाटक काँग्रेसमध्ये प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्षपदाच्या संभाव्य बदलाची चर्चा सुरू असताना सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सुरू असलेल्या चर्चेला बुधवारी फेटाळून लावत म्हंटले की हा निर्णय पूर्णपणे पक्षाच्या हाय कमांडचा आहे, राज्यातील नेत्यांचा नाही.
केपीसीसी अध्यक्षपदाबाबत अलिकडेच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री जारकीहोळी प्रतिक्रिया देत होते. ते म्हणाले की, “केपीसीसी अध्यक्षपदाबाबत कांही चर्चा असेल तर ती डी. के. शिवकुमार यांनाच विचारावी. आमचा त्याच्याशी काहींही संबंध नाही. जर काँग्रेस हाय कमांडला डीकेनांच पुढे चालू ठेवायचे असेल तर ते चालू राहतील, जर नाही तर ते राहणार नाहीत. ते इतके सोपे आहे.”
या विषयावर टीका करताना मंत्र्यांनी आठवण करून दिली की, केपीसीसीचे माजी अध्यक्ष डॉ. जी. परमेश्वर यांनी अध्यक्षपदाच्या भूमिकेत 8 वर्षे काम केले होते. “कोणाला माहित इव्हन डी. के. शिवकुमार देखील 8 वर्षे किंवा त्याहून आणखी एखादा दिवस जास्त अध्यक्षपदावर राहू शकतील,” असे सतीश यांनी उपहासाने नमूद केले.
मंत्री जारकीहोळी यांनी त्यांच्याच पक्षातील तथाकथित “नोव्हेंबर क्रांती” बद्दलच्या भाकित्यांवरही निशाणा साधला. “आपल्याच लोकांचा एक गट म्हणाला की उद्या नोव्हेंबरमध्ये क्रांती होईल, आता आज 21 नोव्हेंबर उजाडला तरी मला अजूनही कोणतीही क्रांती दिसत नाही.” तसेच “ज्यांनी भाकीत केले त्यांनी आता ही क्रांती कुठे गेली ? हे स्पष्ट करावे,” असे त्यांनी म्हटले.
राज्य सरकारमधील नेतृत्व बदलाबाबतच्या प्रश्नांवर मात्र मंत्री सतीश जारकीहोळी यांनी संयम बाळगला. “मी आधीच नेतृत्वाच्या बाबींवर पुरेसे बोललो आहे, मला इतरांनी केलेल्या वक्तव्यांवर भाष्य करायचे नाही. त्यांना त्यांचे स्वतःचे विधान स्पष्ट करू द्या,” असे मंत्री पुढे म्हणाले. सरकारच्या कामगिरीबद्दल मंत्र्यांनी असे प्रतिपादन केले की प्रशासनाने अडीच वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आश्वासनाप्रमाणे संपूर्ण कालावधी पूर्ण करू.
“आम्ही गेल्या अडीच वर्षांत चांगले काम केले आहे आणि आम्ही ते करत राहू आणि कांहीही झाले तरी गॅरंटी योजना बंद केल्या जाणार नाहीत,” असे ते म्हणाले. मागील आठवड्यापासून सुरू असलेला राजकीय अध्याय आता तीव्र झाला असला तरी एकंदर मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या वक्तव्यावरून असे दिसून येते की केपीसीसी अध्यक्ष पदाचा अंतिम निर्णय फक्त दिल्लीतूनच येईल, बेंगलोरमधून नाही.




