बेळगाव लाईव्ह : बसवेश्वर सर्कल येथील वाहतूक व्यवस्थेतील गंभीर दोषामुळे अपघाताचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून, या परिसरातील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्कलमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
हा महत्त्वाचा चौक खानापूर रोड, शहापूर आणि महात्मा फुले रोड यांना जोडतो. येथील सिग्नल कार्यरत असले तरी, काही मार्गांवर असलेल्या ‘फ्री टर्न’ व्यवस्थेमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. आरपीडी सर्कल किंवा रेल्वे ओव्हर ब्रिजकडून येणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडणे अत्यंत कठीण झाले आहे. या सदोष व्यवस्थेमुळे गेल्या चार महिन्यांत या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी अनगोळ येथील माजी नगरसेवक विनायक गोपाळ गुंजटकर यांनी बेळगाव शहर महापालिकेच्या महापौरांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्कलचे डिझाईन बदलून त्यात तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. या आराखड्यामध्ये साधारण चन्नम्मा चौकातील आराखड्यानुसार बसवेश्वर चौकात व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
यासोबतच, त्यांनी सर्कलच्या सौंदर्याकडे झालेल्या दुर्लक्षाबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. सर्कलच्या मध्यभागी असलेले कारंजे अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे.
तसेच, सर्कलमध्ये असलेला म्हशींसह शेतकऱ्याचा पुतळा जीर्ण झाला आहे. “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे,” असे नमूद करत त्यांनी पुतळ्याची स्वच्छता करून, तिथे प्रकाशयोजना आणि वृक्षारोपण करून परिसर सुशोभित करण्याची विनंती केली आहे.


