बेळगाव लाईव्ह :क्रेडाई बेळगावचे सदस्य गोपाळराव कुकडोळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने बहुमजली बांधकामासाठी लगतच्या भूखंडाचे एकत्रीकरण करण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
क्रेडाई बेळगावचे सदस्य असलेल्या हिंदवाडी येथील गोपाळराव कुकडोळकर यांनी त्यांच्या गृहप्रकल्पासाठी दोन भूखंडाचे एकत्रीकरण करण्यास परवानगी मागितली होती. तथापी डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड बेळगाव यांनी सदर परवानगी नाकारल्यामुळे कुकडोळकर यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाकडे दाद मागितली होती.
उच्च न्यायालयाच्या 15 ऑक्टोबर 2025 च्या आदेशानुसार 18 ऑक्टोबर 2023 च्या भूमी अभिलेख संचालकांचा पूर्वीचा आदेश रद्द करत अधिकाऱ्यांना दोन्ही लगतच्या भूखंडाचे एकाच भूखंडात एकत्रिकरण करून सीटीएस क्रमांक जारी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने बांधकाम व्यवसायिक व डेव्हलपर्सना दोन किंवा लगतच्या अधिक भूखंडांवर बहुमजली इमारती बांधण्याची परवानगी दिली आहे. एकत्रित झालेल्या मालमत्तेचा यापुढे कायदेशीर पद्धतीने एकच भूखंड मानला जाणार आहे.
त्यामुळे परवानगी मिळणे सोयीचे होणार आहे. राज्यभरातील बांधकाम व्यवसायकांना या निकालाचा फायदा होणार आहे. क्रेडाई बेळगावचे सदस्य गोपाळराव कुकडोळकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय लागला आहे.


