बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या विविध विभागांमध्ये झालेल्या २१७ कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजला. या गैरव्यवहारावर त्वरित तोडगा काढला नाही, तर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, अशी आक्रमक मागणी नगरसेवकांनी केली आहे.
महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला बोलताना सत्ताधारी पक्षाचे नेते हणमंत कोंगाली यांनी महापालिकेच्या विविध विभागांमधील २१७ कोटींच्या अनियमिततेवर बोट ठेवले. त्यांनी अधिकाऱ्यांना या गैरव्यवहाराची दुरुस्ती करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली. या कालावधीत समाधानकारक खुलासा न झाल्यास, हा २१७ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्टपणे नमूद करून सरकारकडे अहवाल पाठवावा लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. या भूमिकेला विरोधी पक्षानेही पाठिंबा दिला, तर महापौर पवार यांनीही संमती दर्शवली.
याच दरम्यान, नामनिर्देशित सदस्य रमेश सोनटक्की यांनी बोलण्यास सुरुवात करताच, सत्ताधारी पक्षाचे रवी धोत्रे यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. दरम्यान महापौरांना विचारलेल्या प्रश्नाला नेहमीच रवी धोत्रे हे का उत्तर देतात? असा जाब रमेश सोनटक्की यांनी विचारला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला. कोणत्याही मुद्द्यावरून विचारलेल्या प्रश्नाला महापौर किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याऐवजी नेहमीच रवी धोत्रे का उत्तर देतात? त्यांना सभागृहाने पॉवर ऑफ ऍटर्नी दिली आहे का? असा सवाल उपस्थित केला. नगरसेवक रमेश सोनटक्की, रवी साळुंके यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी हाच मुद्दा उपस्थित करत नगरसेवक रवी धोत्रे यांना घेरले. मात्र यावेळीही सभागृहातील चर्चेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत नगरसेवक रवी धोत्रे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार कुणी दिलाय? असा उद्धट प्रश्न विचारला. यावर सभागृहातील विरोधी पक्षातील नगरसेवकांनी यावर आक्षेप घेत आपण निवडून आलेले नगरसेवक असून आम्हाला सर्व गोष्टी विचारण्याचा आणि सभागृहातील कामकाजात सहभाग घेण्याचा आणि चुकीच्या गोष्टींचा जाब विचारण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांनी महापौरांना नियम सर्वांसाठी सारखाच लागू करावा अशी विनंती केली.
यावेळी माजी आमदार फिरोज सेठ यांच्या कार्यकाळात किल्ला परिसरातील बांधण्यात आलेल्या कारंजा पुन्हा सुरू कराव्यात, तसेच खाऊ कट्टा येथील गाळे सुरु करावेत अशी मागणी प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका रेश्मा भैरकदार यांनी मागणी केली. अमृत योजनेंतर्गत ८ कोटी रुपयांच्या कामातून गटार आणि पेव्हरचे बांधकाम सुरू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावर विरोधी पक्षनेत्यांनी, “तेथील दुकाने बंद का ठेवण्यात आली आहेत?” असा थेट प्रश्न उपस्थित केला. यावर महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तेथे चार दुकाने बांधून महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहेत आणि त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असे स्पष्ट केले.
बेळगाव महानगरातील वाढत्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारणे, आणि विशेषतः शाळा-कॉलेजांकडून रस्त्यांवर होणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण मिळवणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी अपघातांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करत, दिवंगत महापौर संभाजीराव पाटील यांच्या काळात झालेल्या रस्ते रुंदीकरणाप्रमाणे पुन्हा मोहीम हाती न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर, नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी जत्तीमठ रोडवरील रुंदीकरण अपूर्ण राहिल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर लक्ष वेधले.
कॉलेज रोडवरील पार्किंगमुळे रुग्णवाहिकेलाही जाणे शक्य होत नसल्याचे नमूद करत नगरसेवक शंकर पाटील आणि शाहीन खान पठाण यांनी संबंधित शाळा-कॉलेजांना तातडीने नोटीस बजावण्याची आणि रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या आस्थापनांवर अधिक कर लावण्याची मागणी केली. यावर एसीपी शिवाजीराव यांनी, पादचारी आणि व्यापाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देत वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना सुरू असून, अनधिकृत पार्किंग करणाऱ्या शिक्षण संस्थांना नोटीस बजावण्यात आल्याचे सभागृहाला सांगितले.


