बेळगाव लाईव्ह :काळा दिन साजरा करताना काढण्यात आलेल्या निषेध फेरीमुळे अखेर पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाईची काठी उगारली आहे. बेळगावातील मार्केट पोलिस ठाण्यात ३८ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी १०० ते १५० कार्यकर्त्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने काळा दिनानिमित्त निषेध फेरी काढली होती. पोलिसांनी यापूर्वीच फेरीस परवानगी नाकारून, कोणत्याही प्रकारचा मोर्चा किंवा सभा घेऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध झुगारून काळे झेंडे घेऊन फेरी काढली आणि घोषणाबाजी केली.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फेरीचे व्हिडिओ आणि छायाचित्र पुरावे गोळा करून चौकशी सुरू केली. पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “विनापरवाना फेरी काढल्याचा तपास सुरू असून, जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.” त्यानुसार रविवारी (ता. २) गुन्हा नोंदविण्यात आला.
दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग, सरकारी आदेशाचे उल्लंघन आणि भडकाऊ घोषणाबाजीचे कलम लागू करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समितीचे काही प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये प्रमुख नावे पुढीलप्रमाणे आहेत —
मनोहर कल्लप्पा किणेकर (हिंडलगा), मालोजी अष्टेकर (कंग्राळ गल्ली), प्रकाश मरगाळे (पाटील मळा), शुभम शेळके (महांतेशनगर), रमाकांत कोंडुसकर (गांधीनगर), रणजित चव्हाण पाटील (पाटील गल्ली), अमर येळूरकर (चव्हाट गल्ली), गजानन पाटील (तहसीलदार गल्ली), नेताजी जाधव (शहापूर), अंकुश केसरकर (चव्हाण गल्ली), मदन बामणे (हिंदवाडी), प्रशांत भातकांडे (होसूर बसवण गल्ली), जयेश भातकांडे (खासबाग), महेश नाईक (हट्टीहोळी), किरण गावडे (टिळकवाडी), रेणू किल्लेकर (शास्त्रीनगर), सरिता पाटील (टिळक चौक), किरण उदरे (शहापूर), श्रीकांत कदम (नाथ पै सर्कल), चंद्रकांत जयवंत कोंडुसकर (गांधीनगर), संतोष कृष्णाचे (वंटमुरी कॉलनी), गुंडू कदम (आनंदवाडी), हनमंत मधुकर (देसूर), प्रकाश शिरोळकर (कोनवाळ गल्ली), शिवाजी पुंडलिक मंडोळकर (शिवाजीनगर), महेश बिर्जे (शास्त्रीनगर), सुहास हुद्दार (खासबाग), उमेश कुर्याळकर (राजहंस गल्ली), जोतिबा पालेकर (जोशी गल्ली), बाबूराव केरवाडकर (मंगाईनगर), विश्वजित चौगुले (खडक गल्ली), विशाल भातकांडे (भांदुर गल्ली), निहाल शहापूरकर (भातकांडे गल्ली), विठ्ठल पाटील (गणपत गल्ली), येल्लारी बिडकर (कामत गल्ली) यांचा समावेश आहे.
दरम्यान, या कारवाईबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की,
“काळा दिन साजरा करणे हा आमचा वैचारिक आणि लोकशाही अधिकार आहे. या आंदोलनाला गुन्हेगारी रंग देणे हा अन्याय असून, सरकार विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे.”



