बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रा. राजश्री नागराज यादव यांना यंदाचा कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निर्णयावर बेळगाव जिल्हा कन्नड क्रिया समितीने आक्षेप घेतला आहे. या राज्योत्सव पुरस्काराच्या निवडीला बेळगाव जिल्हा क्रिया समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी मुख्यंमत्री सिद्धरामय्या आणि मंत्री एच के पाटील याना पत्र लिहिले आहे.
बेळगाव जिल्हा कन्नड संघटनांच्या क्रिया समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा निर्णय अत्यंत निंदनीय असून सीमाभागात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विधानपरिषद सदस्य नागराज यादव यांच्या पत्नी असल्यामुळेच त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचा आरोप समितीने केला आहे.
संघटनांच्या मते, मराठा मंडळ संस्थेने कधीही कन्नड भाषा, संस्कृती किंवा राज्योत्सवाबद्दल सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. संस्थेच्या नावफलकांवरही कन्नड दिसत नाही, हे नमूद करण्यात आले आहे. तसेच, राज्योत्सव पुरस्कार ६० वर्षांवरील व्यक्तींनाच देण्याचा नियम स्पष्टपणे मोडला गेला आहे, असे पत्रात म्हटले आहे.
समितीने राज्य सरकारला आवाहन केले आहे की,“सरकारचा सन्मान आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी निर्णय मागे घ्यावा” यासह “राजश्री यादव यांना पुरस्कार देण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करून, बेळगावातील कन्नड कार्यकर्त्यांपैकी पात्र व्यक्तींना सन्मानित करावे.”असेही म्हटले आहे.याशिवाय
समितीने सुचवलेले पात्र व्यक्ती:
बी.एस. गविमठ (८० वर्षे) – साहित्य क्षेत्रातील योगदान
बसवराज जगजंपी (७८ वर्षे) – रंगभूमीतील कार्य
एल.एस. शास्त्री (८२ वर्षे) – पत्रकारिता क्षेत्रातील सेवा
एस.एम. कुलकर्णी (८३ वर्षे) – कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष
एच.बी. कोळकार – साहित्य क्षेत्रातील नावाजलेले कार्यकर्ते
डी.एस. चौगला – प्रसिद्ध रंगकर्मी
मानव बंधुत्व वेदिका – प्रा. वाय.बी. हिम्मडगी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतिशील कार्य समितीने या सर्वांचा विचार करून त्यापैकी कोणालाही राज्योत्सव पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे बेळगावात राजकीय वातावरण तापले आहे.



