बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सरकारी कार्यालयांपैकी एक असलेल्या दक्षिण उपनोंदणी (सब-रजिस्ट्रार) कार्यालयाचा भोंगळ कारभार बुधवारी उघडकीस आला. या कार्यालयाचे दोन महिन्यांचे वीज बिल थकीत असल्यामुळे, बुधवारी दुपारी १२ वाजता हेंस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची नामुष्की ओढवली.
उपलब्ध माहितीनुसार, उपनोंदणी कार्यालयाकडे हेंस्कॉमचे दोन महिन्यांचे एकूण १ लाख ९ हजार रुपये इतके वीज बिल थकीत आहे. बिल भरण्यास वारंवार टाळाटाळ केल्यामुळे अखेरीस हेंस्कॉमला ही कठोर कारवाई करावी लागली.
वीज पुरवठा बंद होताच कार्यालयात अंधार पसरला आणि सर्व्हर डाऊन झाले. यामुळे दस्तऐवज नोंदणीसाठी आलेल्या लोकांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांचे महत्त्वाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्काळात थांबले, आणि नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.
कार्यालयाचे कामकाज ठप्प झाल्यामुळे उपनोंदणी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी हेंस्कॉमच्या अधिकाऱ्यांकडे विनवणी केली. अधिकाऱ्यांनी ‘बजेट नसल्याचे’ कारण सांगत बिल भरण्यास टाळाटाळ केली. मात्र, केवळ सरकारी कार्यालय आहे म्हणून हेंस्कॉमने सायंकाळी उशिरा सात वाजता त्याची पुनर्जोडणी केली.
हा अजब प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर टीका होत आहे. कारण, बेळगाव शहरातील सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या कार्यालयाचेच वीज बिल थकीत असेल, तर यापुढे काय बोलायचे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, वीज जोडणी पूर्ववत झाली असली तरी, हे बिल अद्यापही थकीतच असल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे.




