बेळगाव लाईव्ह : विजापूरचे भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी बेळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षातील भावी नेतृत्वावर आणि भाजपच्या राज्य नेतृत्वावर गंभीर राजकीय भाष्य केले आहे.
नोव्हेंबर महिन्यात कर्नाटकात ‘क्रांती’ होऊन ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असे मोठे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. तसेच, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष केल्यास दुसऱ्याच दिवशी ‘जेसीबी पूजा’ होईल, असा थेट इशारा देऊन त्यांनी भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला आव्हान दिले आहे.
विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी एका माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, नोव्हेंबरमध्ये क्रांती होऊन सतीश जारकीहोळी किंवा डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार नाहीत; तर आपण पाहाल, मल्लिकार्जुन खर्गेच या राज्याचे मुख्यमंत्री बनतील, असे भाकीत त्यांनी केले. पत्रकार परिषदेत त्यांनी “सतीश जारकीहोळी मुख्यमंत्री होतील, यासाठी मी काय काँग्रेसचा प्रवक्ता आहे का?” असा प्रतिप्रश्न केला. पुढे बोलताना, “सतीश जारकीहोळी किंवा एम.बी. पाटील मुख्यमंत्री झाले तरी आमचा कोणताही विरोध नाही. कारण, २०२८ पर्यंत सर्व काही मातीमोल होईल आणि नोव्हेंबर क्रांती होऊन मल्लिकार्जुन खर्गेच मुख्यमंत्रीपदावर बसतील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“जितकी धमक एम.बी. पाटील यांच्यात आहे, तितकीच माझ्यातही आहे,” असे त्यांनी नमूद केले. “नकली प्रतिज्ञापत्र देणाऱ्या पाटलांशी ते चर्चा करत होते. आता मूळ पाटलांशी त्यांचा मूळ संघर्ष सुरू झाला आहे. आमच्यासोबत समस्त सनातन धर्म उभा आहे, त्याच्यापुढे कोणतीही ‘आर्मी’ चालणार नाही. ‘भीम आर्मी’ मुस्लीम-समर्थित असून, त्यात दलितांपेक्षा मुस्लिमांचा सहभाग अधिक आहे. दलित समाज हा आमचाच भाग आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, “मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांच्या हृदयात बसवण्णा नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
“जशी मोदींनंतर योगी आदित्यनाथ पंतप्रधान व्हावेत, ही देशातील लोकांची भावना आहे; तशीच काँग्रेस सरकार गेल्यानंतर यत्नाळ यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी राज्यातील जनतेची भावना आहे,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. “विजयेंद्र यांची पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा झाल्यास दुसऱ्याच दिवशी ‘जेसीबी पूजा’ होईल.
राज्यातील भाजप नेते आणि केंद्रातील खासदार आमच्या संपर्कात आहेत. बिहार निवडणुकीनंतर पक्षाने निर्णय न घेतल्यास आमची ‘जेसीबी’ तयार आहे. कोणत्याही परिस्थितीत विजयेंद्र यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही,” अशा कठोर शब्दांत त्यांनी भाजप नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. तसेच, दिल्लीत आम आदमी पार्टी सत्तेवर आली, त्याचप्रमाणे कर्नाटकात आमचा पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



