बेळगाव लाईव्ह : मुतगा ते मुचंडीला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर मुतगा ग्रामपंचायतीने टाकलेला कचरा आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या आता गंभीर बनली आहे. या परिसराच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे सर्रास दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक आणि या रस्त्याचा वापर करणारे प्रवासी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.
मुतगा-मुचंडी रस्ता हा परिसरातील अनेक गावांसाठी मुख्य मार्ग असून, या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यात शेतकरी आणि कामगार वर्गाचा समावेश अधिक आहे. रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायतीने टाकलेल्या या कचऱ्यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली आहे. सकाळ-संध्याकाळ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना रोज नाकाला रुमाल लावून जाण्याची वेळ आली आहे. रस्त्यावरून चालताना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून येणाऱ्या या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ग्रामपंचायत प्रशासन कचरा व्यवस्थापनाच्या नियमांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत. हा कचरा वारंवार रस्त्याच्या बाजूला टाकला जात असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणूनही कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाहीये, असे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक प्रशासनाची ही अनास्था नागरिकांना स्पष्टपणे दिसत असून, यामुळे ग्रामपंचायतीबद्दल संताप व्यक्त होत आहे.
या उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे परिसरात डास आणि इतर किटकांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे एखाद्या नागरिकाच्या जीवाला काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी मुतगा ग्रामपंचायत घेणार का? आणि झालेल्या नुकसानीची भरपाई ग्रामपंचायत देईल का? असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे.
तातडीने हा कचरा हटवावा आणि कायमस्वरूपी कचरा डेपोची योग्य व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.


