Saturday, December 6, 2025

/

अधिकाऱ्याच्या बदलीसाठी सत्ताधारी नगरसेवकांचा प्रशासनाविरोधात एल्गार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल उपायुक्तां रेश्मा तालिकोटी यांच्याविरोधात सभेत ठराव मंजूर होऊनही त्यांची बदली झाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी आज मनपा मुख्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले. भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून पाठिंबा मिळत असल्याचा आरोप करत, निवडलेल्या सदस्यांच्या अधिकारांना किंमत दिली जात नसल्याची तीव्र नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली.

बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल उपआयुक्तांची बदली करण्याचा परिषदेच्या सभेत ठराव संमत झाला होता.

मात्र, अनेक तक्रारी असूनही त्यांची बदली न झाल्यामुळे आज बेळगाव महानगरपालिकेच्या मुख्यालयात नगरसेवकांनी धरणे आंदोलन पुकारले. महसूल उपआयुक्तांविरोधात अनेक तक्रारी असताना आणि त्यांच्या बदलीचा ठराव मंजूर होऊनही त्या आजही पदावर कार्यरत आहेत. याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी, निवडलेल्या सदस्यांना प्रशासनात कोणतीही किंमत राहिली नाही, असा आरोप करत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक मनपासमोर ठिय्या मांडून बसले.

 belgaum

यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांनी आंदोलकांना संबोधित केले. “आम्ही लवकरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत.

यावेळी सामूहिक राजीनामा देण्यासंबंधीचे निवेदनही सादर केले जाईल.” बेळगाव महानगरपालिकेला योग्य अधिकारी द्यावेत आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची सेवा तत्काळ समाप्त करावी, अशी मागणी कोंगाळी यांनी केली.

भ्रष्टाचारामध्ये गुंतलेल्या अधिकाऱ्यांची बदली न करता त्यांना सेवेत कायम ठेवले जात आहे. निवडलेल्या सदस्यांविरुद्ध सरकारकडून षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

या आंदोलनात सत्ताधारी पक्षाचे अनेक नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.