बेळगाव लाईव्ह : काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींवर भाजपचे नेते वारंवार टीका करत असल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बेळगाव दौऱ्यावर असताना थेट सवाल केला. “भाजप आमच्या पक्षाचा हाय कमांड झाला का? त्यांना आमच्या पक्षाच्या निर्णयात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणी दिला?” असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे.
बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका केली. विधान परिषदेचे सदस्य सी.टी. रवी यांनी केलेल्या “सिद्धरामय्याच मुख्यमंत्री राहणार” या विधानावर भाजपकडून टीका झाली होती, यावर उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले,
“भाजपने त्यांच्या पक्षाची चिंता करावी. आमचा मुख्यमंत्री कोण राहील हे ठरवण्याचा अधिकार आमच्या हाय कमांडकडे आहे, भाजपकडे नाही. भाजपाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही आणि ते दुसऱ्याच्या घरात डोकावतात!” असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी मुख्यमंत्री केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हणाले, “एनडीआरएफचा निधी आम्ही गॅरंटी योजनेसाठी वापरलेला नाही. पण भाजपला या योजनेचा एवढा त्रास का होतोय? गॅरंटी योजना यशस्वी झाली, म्हणून त्यांची पोटात आग झाली आहे!”
कर्नाटकातील गॅरंटी योजना आता देशभर पोहोचली आहे, हे अधोरेखित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही चिमटा काढला. “जे मोदी आधी म्हणाले होते की ही योजना यशस्वी होणार नाही, त्यांच्याच पक्षाने आता ती योजना इतर राज्यांमध्ये कॉपी करायला सुरुवात केली आहे, हेच भाजपचं खोटं राजकारण दाखवतं.” बेळगाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर बोलताना ते म्हणाले, “हे हॉस्पिटल मी मंजूर केले होते. भाजप सरकारने पुढे काहीही काम केलं नाही. जनतेच्या आरोग्याशीही त्यांनी राजकारण केलं.”
वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील यांनी खुलासा दिला की, हॉस्पिटल कोणत्याही खासगी संस्थेला दिलं गेलेलं नाही. “सरकारी डॉक्टर अनुपलब्ध असतील, तिथेच तात्पुरती व्यवस्था म्हणून खासगी डॉक्टरांना बोलावलं जातं,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, रामलिंगा रेड्डी, आसिफ सेठ, राजू कागे, अंजली निंबाळकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.




