बेळगाव लाईव्ह :आजारी असल्यामुळे हॉस्पिटलला जाऊन घरी परतताना रस्त्यावर कोसळल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन एक इसम जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना आज शनिवारी सकाळी बेळगाव किल्ला येथे उघडकीस आली.
मयत इसमाचे नांव काकती येथील गणपती पाटील असे असल्याचे कळते. गणपती हा गेल्या कांही महिन्यांपासून आजारी होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी वरचेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ये-जा करावी लागत होती.
त्यानुसार काल रात्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन तो घरी परत येत असताना ठेचाळून रस्त्यावर कोसळला. परिणामी डोक्याला गंभीर मार बसून तो जागीच गतप्राण झाला.
सदर प्रकार आज शनिवारी सकाळी उघडकीस येताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. बेळगाव मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली आहे.


