बेळगाव लाईव्ह :पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बेंगलोर येथील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयामध्ये एक खाजगी तक्रार करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांविरुद्ध एफआयआर अर्थात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
मुडलगी (जि. बेळगाव) येथील माहिती हक्क कार्यकर्ता भीमाप्पा गडाद यांनी उपरोक्त खाजगी तक्रार केली आहे. केंद्र सरकारच्या दरवाढीच्या विरोधात गेल्या 28 एप्रिल 2025 रोजी बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याप्रसंगी व्यासपीठावरून भाषण करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी धारवाड तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण बरमणी यांच्यावर जोरात ओरडून एक वचनी संबोधले.
तसेच पोलीस गणवेशात कर्तव्य बजावणाऱ्या बरमणी यांना मारण्यासाठी रागाच्या भरात हात उगारला. सदर घटना म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 132 अन्वये गुन्हा असल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर एफआयआर दाखल व्हावा यासाठी गेल्या 12 जून 2025 रोजी बेळगावच्या कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून देखील एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.
हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या कारणास्तव आता बेंगलोर येथील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयामध्ये आज गुरुवारी 25 सप्टेंबर 2025 रोजी आपण खाजगी तक्रार दाखल केली आहे.
तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यास बेळगावच्या कॅम्प पोलीस ठाण्याला निर्देश देण्याची विनंती तक्रारीच्या माध्यमातून न्यायालयाला केली आहे, अशी माहिती माहिती हक्क कार्यकर्ता भीमप्पा गडाद यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


