बेळगाव लाईव्ह :बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या गोसाई मठाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामीजी यांच्यासह मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांच्या बैठकीमध्ये आपल्या समाजाच्या हितोन्नतीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच राज्यात जातीनिहाय जनगणती सुरू होत असल्यामुळे या प्रक्रियेत मातृभाषा, धर्म आणि जात यांच्या रकाना क्रमांक 16, 17 आणि 18 मध्ये समाज बांधवांनी अनुक्रमे मराठी, हिंदू आणि मराठा -उपजात कुणबी असा उल्लेख करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेंगलोर येथे मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांची महत्वपूर्ण बैठक आयोजिण्यात आली होती. बेंगलोर येथील गोसाई मठाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठा समाज हितोन्नतीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला आमदार श्रीनिवास माने, विधानपरिषद सदस्य डॉ. मारुतीराव मुळे, मंत्री संतोष लाड, माजी मंत्री पीजीआर सिंधिया, कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा परिषद अध्यक्ष, सुरेशराव साठे, शामसुंदर गायकवाड, केसरकर, बेळगाव मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यासह राज्यातील मराठा समाजाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील सिद्धरामय्या सरकारने हाती घेतलेल्या जातीय जनगणनेला लवकरच सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने हेस्कॉमने प्रत्येकाच्या दरवाजावर स्टिकर्स चिकटविले आहेत. जनगणना प्रक्रियेत रकाना क्रमांक 16, 17 आणि 18 मध्ये मातृभाषा, धर्म आणि जात याचा उल्लेख असून यामध्ये मराठा समाज बांधवांनी काय नमूद करावे याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.
मातृभाषा असणाऱ्या रकान्यात मराठी, धर्म रकान्यात हिंदू, आणि जात असा उल्लेख असणाऱ्या रकान्यात मराठा आणि उपजात कुणबी असा उल्लेख केला जावा, असा ठराव संमत बैठकीत करण्यात आला. याशिवाय समाजाच्या हिताच्या दृष्टीने सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग-व्यवसाय यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
तसेच जिल्हा पातळीवर समाजाच्या बैठका घेऊन याविषयी जनजागृती करण्याचा आणि मराठा समाज बांधवांच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा ठोस निर्णय यावेळी घेण्यात आला. मंजुनाथ स्वामीजी यांच्यासह सुरेशराव साठे, शामसुंदर गायकवाड, बेळगाव मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनीही बैठकीत विचार मांडले. 22 सप्टेंबरला जातीय जनगणनेला प्रारंभ होत आहे.
यामुळे जनजागृतीसाठी आपल्याकडे खूपच कमी वेळ आहे. याचा गांभीर्याने विचार करून जिल्हावार, तालुकावार जनजागृती बैठका घेऊन यासंदर्भात जनजागृती करावी तसेच गाव पातळीवर परिपत्रकाचे वाटप करून ही बाब लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे मत किरण जाधव यांनी बैठकीत व्यक्त केले. नागेश देसाई, विनायक कदम, धनंजय जाधव यासह अन्य समाज बांधव देखील बैठकीला उपस्थित होते.


