बेळगाव लाईव्ह :श्री गणेश उत्सवानिमित्त मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ झेंडा चौक मार्केट बेळगाव यांच्यातर्फे आयोजित ’21 वी श्री गणेश -2025′ किताबाच्या बेळगाव जिल्हा आणि ग्रामीण पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. या स्पर्धेच्या अनुषंगाने घेण्यात आलेली करेला स्पर्धा काल मंगळवारी यशस्वीरित्या पार पडली.
भाग्यनगर, टिळकवाडी येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या (बीडीबीबीए) सहकार्याने आयोजित उपरोक्त शरीर सौष्ठव स्पर्धेचा उद्घाटन समारंभ काल मंगळवारी सायंकाळी उत्साहात पार पडला.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल दीपक गुरुंग, उद्योगपती शिरीष गोगटे, बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, चंद्रकांत दोरकाडी, डीसीपी नारायण बरमनी, एसीपी कट्टीमणी, माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल, माजी रेल्वे अधिकारी सुनील आपटेकर ,विजय जाधव राकेश कलघटगी व मि. एशिया कांस्य पदक विजेते शरीर सौष्ठवपटू किरण वाल्मीकी उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यंदाची 21 वी श्री गणेश -2025 किताबाची शरीरसौष्ठव स्पर्धा काल रात्री उशिरापर्यंत अनुक्रमे 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो आणि 75 किलो वरील गट अशा सहा गटांमध्ये घेण्यात आली. स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी क्रीडाशौकिनांनी रामनाथ मंगल कार्यालय येथे एकच गर्दी केली होती.










करेला स्पर्धेत यशवंत सुतार विजेता
दरम्यान, तत्पूर्वी काल मंगळवारी सकाळी रामनाथ मंगल कार्यालय येथे करेला फिरवण्याची स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेमध्ये यशवंत सुतार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. करेला स्पर्धेतील पहिले 10 क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांमध्ये अनुक्रमे यशवंत सुतार, भारत तिवारी, पृथ्वीराज बेटगिरीकर, सागर गोरे, गजानन गावडे, सुमित कामुले, महादेव वाळके, गणेश गुंडू जांगळे, भावेश बेटगिरीकर आणि नामदेव कोळेकर यांचा समावेश आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ, झेंडा चौकचे अध्यक्ष अमित किल्लेकर, सेक्रेटरी राजू हंगिरगेकर, अजित सिद्दण्णावर, सुनील राऊत आदींसह मंडळाच्या अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


