बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवातील महाप्रसादाला विरोध करणाऱ्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांविरोधात आज मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. जत्तीमठ मंदिरात पार पडलेल्या बैठकीत नगरसेवकांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला.
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे रमाकांत कोंडुसकर यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत गणेश विसर्जन मिरवणुकीत महाप्रसाद वाटप करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय जाहीर केला होता.
मात्र, महानगरपालिकेतील काही नगरसेवकांनी याला विरोध केला. हिंदुत्वाच्या नावावर निवडून आलेले नगरसेवक अशा पद्धतीने हिंदू धर्मातील सणांच्या बाबतीत भूमिका घेत असतील, तर ते अत्यंत चुकीचे आहे.” जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे राजकारण करून त्याला विरोध करणाऱ्या सर्व नगरसेवकांचा निषेध नोंदवताना ते पुढे म्हणाले, “नगरसेवकांनी गणेशभक्तांचा अपमान केला आहे, त्यांनी तात्काळ त्यांची माफी मागावी. गणेशोत्सव मंडळे आणि गणेशभक्तांनी या भूमिकेचा निषेध केला आहे. या वर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ लोकवर्गणीतून महाप्रसादाचे आयोजन करणार आहे.”
रणजित चव्हाण पाटील यांनीही यावर आपले मत मांडले. ते म्हणाले, “गणेशभक्तांना महाप्रसाद देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद होता. मात्र, सत्ताधारी नगरसेवकांनी यावर आक्षेप घेत त्याला चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत चुकीचे असून, याचा आम्ही निषेध करतो.”
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करत म्हटले, “जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रमुखांनी बेळगावच्या ऐतिहासिक गणेशोत्सव मिरवणुकीत महाप्रसादाची सोय करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही नगरसेवकांनी या निर्णयाचे राजकारण करून त्याला विरोध दर्शविला. नगरसेवकांची ही भूमिका बेळगावच्या सांस्कृतिक परंपरेच्या विरोधात असून, लोकप्रतिनिधींचा हा विचार निषेधार्ह आहे. विकासाऐवजी अशा गोष्टींचे राजकारण करणे नगरसेवकांना अशोभनीय आहे.”
बेळगावातील गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना, महाप्रसादावरून सुरू झालेल्या या नव्या वादामुळे शहरात राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. नगरसेवकांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेला हा संघर्ष आता गणेशोत्सव मंडळे आणि गणेशभक्तांच्या निषेधामुळे अधिकच तीव्र झाला असून या सगळ्या घडामोडींदरम्यान मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने आपल्यापरीने महाप्रसाद वाटप करण्याचे ठरवले आहे. यामुळे यापुढे हा वाद काय वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
बैठकीला माजी नगरसेवक नेताजी जाधव, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू बिरजे, सागर पाटील, प्रशांत भातखंडे, संजय जाधव विश्वजीत चौगुले, आदी उपस्थित होते.


