बेळगाव लाईव्ह :बाची (ता. जि. बेळगाव) येथील प्राथमिक मराठी शाळेतील शिक्षिकेची बदली रद्द करावी यासाठी गावातील पालक व ग्रामस्थांनी आंदोलन छेडून उठवलेल्या जोरदार आवाजामुळे संबंधित शिक्षिकेची बदली अखेर रद्द करण्यात आली आहे.
बाची गावातील प्राथमिक मराठी शाळेतील शिक्षिका चंदिलकर यांची बदली कुद्रेमानी येथील शाळेमध्ये करण्यात आली होती. ही बदली रद्द करावी अशी मागणी पालक वर्ग आणि शाळा सुधारणा समितीने (एसडीएमसी) शिक्षण खात्याकडे केली होती.
तथापि त्या मागणीची पूर्तता न होता व सदर शिक्षिका शाळेकडे येणार नसल्याची देण्यात आली होती परिणामी गावातील संतप्त पालक व ग्रामस्थांनी गेल्या शनिवारी शाळा बंद आंदोलन छेडून शाळेच्या गेटला टाळे ठोकले होते.
सदर शिक्षिकेला शाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवावे अशी मागणी कांही पालकांनी थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केल्याचे कळते.
या सर्व घडामोडीनंतर संबंधित शिक्षिकेची बदली रद्द करण्यात आल्याची माहिती शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शाळा सुधारणा समितीसह पालकवर्गात समाधान व्यक्त होत आहे.




