बेळगाव लाईव्ह:सार्वजनिक गणेशोत्सव पुण्या मुंबईनंतर कर्नाटकात बेळगावतच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वत्र जोरदार सुरू असताना अनेक ठिकाणी आगमन सोहळे रंगलेले आहेत. प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव विधायक कसा केला जावा यासाठी प्रयत्न केले जात असले तरी त्या प्रयत्नांना म्हणावे तितके यश मिळताना दिसत नाहीये.
या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात अनेक गणेश मंडळ आहेत जी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती स्थापित करून विधायकता जपण्याचा प्रयत्न करत असतात त्यातीलच एक गणेश मंडळ आहे माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेश मंडळ…. हे मंडळ दरवर्षी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तर सकारात असतेच याशिवाय विविध उपक्रम राबवून विधायकता देखील जपत असते. या गणेश मंडळाची यंदाची ही मूर्ती जुन्या गांधीनगर येथील मूर्तिकार सुनील आनंदाचे यांनी साकारली आहे तीही पर्यावरण पूरक..
बेळगाव शहरात गणेशोत्सवाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. विविध प्रकारच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. मात्र, यावर्षी एका मूर्तिकाराने मक्याच्या कण्यांचा वापर करून पर्यावरणपूरक मूर्ती बनवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बेळगाव शहराचा गणेशोत्सव नेहमीच प्रसिद्ध असतो. यंदाच्या उत्सवासाठी मूर्ती तयार असून, त्यांना अंतिम रूप दिले जात आहे. गेल्या वर्षी चिंचेच्या बिया आणि त्याआधी रुद्राक्षांपासून गणपतीची मूर्ती बनवून सर्वांचे लक्ष वेधणारे मूर्तिकार सुनील आनंदाचे यांनी यंदा मक्याच्या कण्यांपासून गणपतीची मूर्ती तयार केली आहे.
मुंबईच्या टिटवाळा गणपतीच्या धर्तीवर बनवलेली ही ११.६ फूट उंच मूर्ती तयार करण्यासाठी ३५ किलो मक्याच्या कण्यांचा वापर करण्यात आला असून, यासाठी सलग एक महिना मेहनत घ्यावी लागली. मूर्तीच्या आत गवत आणि कागद वापरण्यात आला आहे, तर कण्या चिकटवण्यासाठी पिठाचा डिंक वापरण्यात आला आहे. या पर्यावरणपूरक गणपतीला तयार करण्यासाठी ४० ते ४५ हजार रुपये खर्च आला आहे. मात्र, मूर्तिकार सुनील यांना कोणताही व्यावसायिक हेतू नसून, छंद म्हणून ते दरवर्षी एक अशी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करतात.
मूर्तिकार सुनील आनंदाचे यांनी सांगितले, “याआधी रुद्राक्ष, चिंचेच्या बिया, माती, शोभेची फुले आणि सुक्या मेव्यापासून पर्यावरणपूरक गणपती बनवले होते. यावर्षी माळीगल्ली गणेशोत्सव मंडळासाठी ही मक्याच्या कण्यांची मूर्ती बनवली आहे.” गेल्या २५ वर्षांपासून मूर्ती बनवणाऱ्या सुनील आनंदचे यांनी त्यांच्या वडिलांकडून ही कला शिकली आहे. सुनील यांनी दरवर्षी तयार केलेल्या अशा पर्यावरणपूरक मूर्तीचे सर्वत्र कौतुक होते.


