बेळगाव लाईव्ह :आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी काल शुक्रवारी बेळगाव शहरातील सौंदर्यवर्धनाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या 10 ब्युटी पार्लर्स वर एकाच वेळी छापा टाकून त्यांना टाळे ठोकले. तसेच सात पार्लर्स ना नोटिसा बजावल्या आहेत.
शहरातील बहुतांश ब्युटी पार्लर्समध्ये सौंदर्यवर्धनाच्या नावाखाली फसवणूक केली जात असल्याच्या त्वचारोगतज्ज्ञ संघटनेच्या तक्रारीची दखल घेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याकडून 30 ब्युटी पार्लर्स वर छापे टाकण्यात आले.
नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि हानिकारक साहित्य वापरल्याबद्दल आम्ही 10 पार्लर्स सील ठोकून बंद केली आहेत. संबंधित ब्युटी पार्लर्समध्ये केस प्रत्यारोपण, रासायनिक ब्लीचिंग आणि त्वचारोग उपचार केले जात होते.
उपचार करताना स्टिरॉइड्सच्या अति वापरामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत होता, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. ईश्वर गडाद यांनी दिली. यासंदर्भात त्वचारोगतज्ज्ञ संघटनेने केलेल्या तक्रारीवरून आरोग्य खात्याच्या विविध पथकांनी एकाच वेळी उपरोक्त छापे टाकण्याची मोहीम राबविण्यात आली असेही त्यांनी स्पष्ट केले.



