बेळगाव लाईव्ह :माजी राष्ट्रीय हॉकी खेळाडू असण्याबरोबरच आघाडीचे हॉकी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असणारे हॉकी बेळगाव संघटनेचे सरचिटणीस सुधाकर चाळके यांचा स्वातंत्र्यदिनानिमित्त क्रीडा क्षेत्रातील विशेष करून हॉकी मधील उल्लेखनीय योगदानाबद्दल बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला.
बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे काल शुक्रवारी भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे औचित्य साधून स्वातंत्र्यसैनिकांबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रीडा क्षेत्रातील विशेष करून हॉकी मधील विशेष योगदानाबद्दल माजी राष्ट्रीय हॉकी खेळाडू व हॉकी बेळगाव संघटनेचे सरचिटणीस सुधाकर चाळके यांना देखील राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते मानाची म्हैसूरी पगडी, शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि गौरवपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. बेळगाव जिल्हा हॉकी संघटना अर्थात हॉकी बेळगावचे 2008 पासून सरचिटणीस असणारे सुधाकर चाळके हे एकेकाळचे मातब्बर हॉकी खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या काळात अनेक हॉकी स्पर्धा गाजवल्या आहेत.
हॉकी खेळावरील प्रभुत्वाच्या जोरावर बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या माध्यमातून लष्करात भरती झालेल्या सुधाकर चाळके यांनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सेनादलाचे प्रतिनिधित्व केले आहे. हॉकी खेळावरील अत्यंतीक प्रेमापोटी लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्यांनी हॉकी प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहण्याद्वारे या खेळाची सेवा सुरूच ठेवली आहे.
सध्या बेळगावातील आघाडीचे हॉकी प्रशिक्षक असणाऱ्या चाळके यांनी अनेक हॉकी खेळाडू घडविले असून त्यापैकी कांही जण राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. हॉकी क्षेत्रातील योगदानाबद्दल आता बेळगाव जिल्हा प्रशासनाने त्यांचा गौरव केल्याबद्दल सुधाकर चाळके यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.



