बेळगाव लाईव्ह: खानापूर तालुक्यातील बीडी येथील घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही चाकूने वार करून आत्महत्या केली.
मृत महिला रेश्मा तिरवीर (वय 29, रा. बीडी) व आरोपी प्रियकर आनंद सुतार हे दोघेही एकाच गावातील असून, गेली दोन वर्षे परस्परांवर प्रेम करत होते. हत्येच्या मागे अनैतिक संबंध कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. रेश्माचा विवाह झाला असून तिला दोन मुले आहेत, तर आनंदलाही तीन मुले असून त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे.
काही दिवसांपूर्वी रेश्माच्या पतीला या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर घरात किरकोळ वाद झाले होते. याबाबत रेश्माच्या पतीने नंदगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आनंदला समज देऊन पुढे रेश्माच्या सहवासात न जाण्याची ताकीद देऊन सोडून दिले होते.
या घटनेचा राग मनात ठेवून गुरुवारी रात्री आनंदने भेटीच्या बहाण्याने रेश्माच्या घरी जाऊन तिला सलग नऊ वेळा चाकूने वार केले. यात ती जागीच ठार झाली. त्यानंतर त्याने त्याच चाकूने स्वतःवर वार केला. त्याला बेळगाव रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
घटनास्थळी बैलहोगल उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) वीरेश हिरेमठ यांनी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. नंदगड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.


