बेळगाव लाइव्ह: शहापूर, बेळगाव येथील श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला यंदाच्या अहवाल साली 45 लाख 31 हजार 576 रुपयांचा निव्वळ नफा झाला असून बँकेने 37 कोटी 76 लाख 40 हजार रुपयांचे कर्ज वितरण केले असल्याची माहिती श्री तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी दिली.
महात्मा फुले रोड, शहापूर येथील बँकेच्या कार्यालयामध्ये 74 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती देण्यासाठी आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेचे सध्या एकूण 8887 सभासद आहेत. बँकेचे मागील अहवाल साली असणारे 1 कोटी 43 लाख 29 हजार 500 रुपयांचे भागभांडवल यंदा वाढवून 1 कोटी 46 लाख 99 हजार 400 रुपये इतके झाले आहे. बँकेचा राखीव व इतर निधी 9 कोटी 67 लाख 74 हजार 315 रुपये इतका आहे. बँकेकडील ठेवींमध्ये यंदा 1.13 कोटी रुपयांनी वाढ झाली असून सध्या 54 कोटी 90 लाख 36 हजार 741 रुपयांच्या ठेवी आहेत. खेळत्या भांडवलामध्ये 1.74 कोटी रुपयांनी वाढ होऊन ते 69 कोटी 87 87 लाख 67 हजार 803 रुपये इतके झाले आहे. बँकेने 27 कोटी 62 लाख 28 हजार रुपयांची गुंतवणूक केली असून बँकेला ‘बी’ ऑडिट वर्ग मिळालेला आहे. यंदाच्या अहवाल साली श्री तुकाराम बँकेकडून शेकडा 11 टक्के लाभांश वितरित करण्यात आला आहे. अहवाल साली कर्ज व्यवहारात रुपये 1.50 कोटींनी वाढ झाली आहे. बँकेने 37 कोटी 76 लाख 40 हजार 103 रुपयांचे कर्ज वितरित केले असून कर्ज वसुली समाधानकारक आहे. वेळेवर व व्यवस्थित हप्ते आणि व्याज भरून बँकेस सहकार्य करणाऱ्या कर्जदारांचे योगदान बँकेच्या प्रगतीस कारणीभूत असल्याचे प्रकाश मरगाळे यांनी आवर्जून नमूद केले. तसेच येत्या रविवार दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता बँकेची 74 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेस श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन मरगाळे यांच्यासह व्हाईस चेअरमन नारायण पाटील, संचालक प्रदीप ओऊळकर, राजेंद्र पवार, राजू मरवे, अनंत जांगळे, मोहन कंग्राळकर, मदन बामणे, प्रवीण जाधव, संजय बाळेकुंद्री, सुनील आनंदाचे, संदीप मुतकेकर, वंदना धामणेकर, पल्लवी सरनोबत, विजय पाटील, महादेव सोंगाडी आणि बँकेचे व्यवस्थापक संकोच कुंदगोळकर उपस्थित होते.




