बेळगाव लाईव्ह :राज्यातील महिला आणि बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘अक्का फोर्स’ हे विशेष पथक लवकरच राज्यभरात तैनात केले जाईल, अशी घोषणा कर्नाटकच्या महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी केली.
कन्नड भाषेत ‘अक्का’ म्हणजे मोठी बहीण, जी संरक्षणात्मक भूमिकेचे प्रतीक आहे. बलात्कार, बालविवाह आणि बालगर्भधारणा रोखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सध्या बिदरमध्ये कार्यरत असलेले अक्का फोर्स हे पथक 15 ऑगस्टपासून म्हैसूर, मंगळुरू आणि बेळगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले जाईल आणि त्यानंतर राज्यभर विस्तारित केले जाणार आहे.
या पथकात महिला पोलिस कर्मचारी आणि वरिष्ठ एनसीसी छात्रांचा समावेश असणारा असून जे महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी गस्त घालण्यासाठी वाहनासह सज्ज असेल.
महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी “लैंगिक गुन्हे आणि बालविवाहांच्या वाढत्या घटना या आमच्यासाठी गंभीर चिंताजनक आहे. त्या रोखण्यासाठी अक्का फोर्स राज्यात कार्यरत राहील,” असे निधर्मी जनता दलाचे नेते सी.बी. सुरेश बाबू यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेत सांगितले.




