बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरालगतच्या हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या गणेशपुर पाईपलाईन रोड परिसरात गेल्या महिनाभरापासून मातकट गढूळ, बारीक कृमीयुक्त दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्य खात्याने याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या गणेशपुर पाईपलाईन रोड या मार्गावर संपूर्ण बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून मुख्य जलवाहिनी असलेल्या या पाईपलाईन रोड परिसरातच नळाद्वारे गढूळ दूषित पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.
सदर परिसर हा हिंडलगा ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये मोडतो. त्यामुळे दूषित पाण्यासंदर्भात वारंवार तक्रार करण्यात येत असली तरी ग्रामपंचायतीकडून अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही सदर प्रभागाचे नगरसेवक देखील जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष करून पक्ष बदलण्यातच धन्यता मानत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

दुधाचा व्यापारी असलेला हा नगरसेवक ‘बघतो’, ‘करतो’ अशी आश्वासने देऊन नागरिकांच्या सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्याऐवजी त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याखेरीज नवी पाईपलाईन घालण्यासाठी या पाईपलाईन रोड रस्त्याच्या शेजारी दीड वर्षांपूर्वी खुदाईचे काम करण्यात आले असले तरी अद्यापपर्यंत नवी जलवाहिनी अर्थात पाईपलाईन घालण्यात आलेली नाही.
त्यामुळे नव्या पाईपलाईनचे विकास काम होण्याऐवजी रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. या पार्श्वभूमीवर आता नळांना गढूळ कृमीयुक्त दूषित पाणी येऊ लागल्यामुळे नागरिकांच्या विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. लोक, लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
तेंव्हा आरोग्य खात्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी आणि पाईपलाईन रोड परिसरात स्वच्छ शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश देऊन जनतेच्या आरोग्याचे रक्षण करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.



