बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य हौशी ज्युडो संघटनेच्या आश्रयाखाली बेळगाव जिल्हा हौशी ज्युडो संघटनेतर्फे आज शुक्रवारपासून रविवार दि. 27 जुलै 2025 या कालावधीत बेळगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या 1ल्या कर्नाटक खुल्या राज्यस्तरीय ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये राज्यभरातील 400 हून अधिक जुडो खेळाडू सहभागी झाले असल्याची माहिती बेळगाव जिल्हा हौशी ज्युडो संघटनेच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली
बेळगाव शहरात आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. डॉ. सरनोबत यांनी सांगितले की, सदर राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धा शहरातील कॉलेज रोडवरील गांधी भवन येथे होत आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेची पूर्वतयारी फार कमी वेळेत म्हणजे अवघ्या महिन्याभरात करण्यात आली असून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेऊन आवश्यक ती सर्व सिद्धता करण्यात आली आहे.
आज चांगले क्रीडापटू निर्माण होण्यासाठी त्यांना प्रायोजकत्व मिळणे जितके गरजेचे आहे, तितकेच आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध असणे हे देखील गरजेचे आहे. त्या अनुषंगाने सदर स्पर्धेसाठी आलेल्या परगावच्या खेळाडूंसाठी नाश्ता, जेवण, निवास वगैरे सर्व सुविधा विनामूल्य पुरवण्यात आल्या आहेत. बेळगाव मधून दर्जेदार ज्युडो खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी आमचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे.
तथापि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेळगावातील क्रीडाप्रेमी धनसंपन्न लोकांनी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ज्या मुलांना क्रीडा क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द घडवायची आहे, त्यांना प्रायोजक मिळणे महत्त्वाचे आहे. तेंव्हा बेळगावातील इच्छुक हौशी क्रीडाप्रेमींनी पुढे येऊन होतकरू ज्युडो खेळाडूंना प्रायोजकत्व मिळवून द्यावे, असे आवाहन करून उद्यापासून स्पर्धेला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत जवळपास 450 खेळाडू सहभागी होतील अशी अपेक्षा असून आतापर्यंत 420 नावांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती डाॅ. सोनाली सरनोबत यांनी दिली.
पत्रकार परिषदेस कर्नाटक राज्य हौशी जुडो संघटनेचे अध्यक्ष अभिजीत यु., सचिव जितेंद्र सिंग, संयुक्त सचिव मलप्रभा जाधव, खजिनदार कोमल हलगेकर, बेळगाव जिल्हा हौशी ज्युडो संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश मुगळी, बसवराज कडली, संयुक्त सचिव ॲड. पूजा गावडे, कर्नाटक राज्य युवा सबलीकरण व क्रीडा खात्याच्या बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील, ज्युडो प्रशिक्षिका कुतुजा मुल्तानी आदींसह संबंधित अन्य उपस्थित होते.
दरम्यान बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच होणाऱ्या खुल्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी स्पर्धकांची नांव नोंदणी प्रक्रिया सुरू होती. नांव नोंदणीसाठी गांधी भवनमध्ये स्थानिक व परगावचे ज्युडो खेळाडू आणि त्यांच्या पालकांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळत होते.


