बेळगाव लाईव्ह :शिरीष गोगटे यांना मी गेल्या 55 वर्षांपेक्षा अधिक काळापासून म्हणजे त्याची पत्नीही त्याला ओळखत नव्हती तेंव्हापासून एक खेळाडू म्हणून ओळखतो. आमच्या काळातील एक उत्तम बॅडमिंटनपटू असण्याबरोबरच शिरीष म्हणजे एक नम्र, साधे आणि दयाळू व्यक्तिमत्व आहे, असे गौरवोद्गार भारताचे महान बॅडमिंटनपटू पद्मश्री प्रकाश पदुकोण यांनी काढले.
बेळगाव स्पोर्ट्स क्लब आणि बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेतर्फे आज बुधवारी सकाळी स्वरूप चित्रपटगृह येथे माजी राष्ट्रीय बॅडमिंटनपटू व उद्योजक शिरीष गोगटे यांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने भारताचे माजी जगज्जेते बॅडमिंटनपटू पदुकोण बोलत होते.
बेळगाव स्पोर्ट्स क्लब आणि बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाप्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती शिरीष रावसाहेब गोगटे यांच्यासह केएलई संस्थेचे अध्यक्ष डाॅ. प्रभाकर कोरे, आशा कोरे, रोहिणी शिरीष गोगटे आणि उजाला प्रकाश पदुकोण उपस्थित होते. प्रारंभी अविनाश पोतदार यांनी उपस्थित यांचे हार्दिक स्वागत केले. तसेच प्रकाश पदुकोण यांच्याबद्दल बोलताना बॅडमिंटन जगज्जेते असूनही त्यापेक्षा त्यांनी कित्येकपटीने जगभरातील लोकांचा आदर मिळवला आहे. ते एक अतिशय सज्जन व्यक्ती असण्याबरोबरच महान खेळाडू देखील आहेत असे सांगितले. महान क्रिकेटपटू खुद्द सुनील गावस्कर यांनी एकदा तुमचा आवडता खेळाडू कोण? या प्रश्नाला मिनिटाचा ही विलंब न लावता “एकमेव पद्मश्री प्रकाश पदुकोण” असे उत्तर दिल्याची माहिती देऊन पदुकोण यांचे श्रेष्ठत्व अधोरेखित केले.
प्रमुख पाहुणे प्रकाश पदुकोण आपल्या भाषणात म्हणाले की, शिरीष गोगटे यांना मी गेल्या 55 वर्षांपेक्षा अधिक काळापासून म्हणजे त्याची पत्नीही त्याला ओळखत नव्हती तेंव्हापासून एक खेळाडू म्हणून ओळखतो. 1960 सालच्या शेवटी आणि 1970 सालच्या प्रारंभ ही जेंव्हा बॅडमिंटन खेळ हा तितका लोकप्रिय नव्हता. त्यामुळे बॅडमिंटनच्या वरिष्ठ, कनिष्ठ कोणत्याही राज्यस्तरीय स्पर्धेत जवळपास सर्व खेळाडू हे बेंगलोरचेच असतं. कारण त्या काळात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बॅडमिंटन खेळले जात नव्हते. तेंव्हा बेळगाव हा एकमेव जिल्हा होता, जेथील मोजक्याच खेळाडूंचा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग असायचा. हुबळी -धारवाडचेही एक-दोन खेळाडू असायचे. त्यावेळी प्रामुख्याने शिरीष गोगटे आणि उमा शेट्टी हे तत्कालीन म्हैसूर राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करायचे. तेंव्हापासून मी शिरीष गोगटे याला ओळखतो तो एक सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू आहे. आम्ही बरीच वर्षे एकत्र खेळलो आहोत. कालांतराने मी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागल्यामुळे आमचा संपर्क कमी झाला. मी डेन्मार्कला राहायला गेलो आणि काही वर्षांनी तेथून परतल्यानंतर म्हणजे 1980 -90 मध्ये आम्ही पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आलो. तथापि त्यावेळी मी विविध स्पर्धांमध्ये व्यस्त रहात असलो तरी गोगटे कुटुंब बेंगलोरला आले की आमच्या घरी भेट देऊन जात असत. कालांतराने पुन्हा आमची कुटुंब एकत्र आली दरम्यान मुलंही मोठी झाली जी एकाच वयाची आहेत. पडूकोण, गोगटे आणि शेट्टी आम्हा तीनही कुटुंबांमध्ये साम्य किंवा वैशिष्ट्य म्हणजे आम्हा तिघांनाही कन्यारत्न झाली आहेत. मला दोन मुली आहेत, शिरीष आणि रोहिणी यांना तीन मुली आहेत तर उमा आणि हरीश यांना दोन मुली आहेत. त्यामुळे सुट्टीत आम्ही एकत्र सहलीला जातो. गेल्या 20 ते 30 वर्षापासून आम्ही हे करत आहोत. अशाप्रकारे आमचे गेल्या अनेक वर्षापासूनचे निकटचे संबंध असून शिरीष हा एक नम्र आणि साध्या व्यक्तिमत्त्वाचा दयाळू मनुष्य आहे. ही बहुदा त्याला मिळालेली वडीलोपार्जित देणगी आहे. आकाराने नसले तरी बेळगाव आणि बेंगलोरमध्ये बरेचसे साम्य असल्यामुळे आम्हाला येथे येणे आवडते. बेळगावचे लोक खूपच आदरातिथ्थी आहेत असे सांगून पद्मश्री प्रकाश पदुकोण यांनी शिरीष गोगटे यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या आणि गोगटे दांपत्याला 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या आजच्या कार्यक्रमास शहरातील सर्व थरातील मान्यवर मंडळी आणि गोगटे कुटुंबीयांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


