बेळगाव लाईव्ह :भटक्या कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात बेळगाव लाईव्हने काल सोमवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची तात्काळ दखल घेत बेळगाव महापालिकेकडून आज सकाळी शहरात विविध ठिकाणी भटकी कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव महापालिका कर्मचाऱ्यांच्या पथकांकडून आज मंगळवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालय आवार, खडेबाजार, चव्हाट गल्ली, मध्यवर्ती बस स्थानक (सीबीटी), काकतीवेस, रविवार पेठ वगैरे ठिकाणी मोहीम राबवून भटकी कुत्री पकडण्याचे सत्र हाती घेण्यात आले आहे.
कुत्र्यांचा हैदोस बाबत सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव या भागांतील नागरिकांनी मनपाकडे कुत्र्यांची व्यवस्था करा अशी मागणी केली होती त्यावर मंगळवारी पासून मनपाकडून जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या पद्धतीने महापालिकेकडून उपद्रवी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात असल्यामुळे नागरिकांसह दुकानदार, व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून ते बेळगाव लाईव्हला धन्यवाद देत आहेत. तसेच भटकी कुत्री पकडण्याची ही मोहीम जनतेकडून माहिती घेऊन संपूर्ण शहरासह उपनगरांमध्ये देखील राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


