बेळगाव लाईव्ह : उत्तर भारतातील मागासलेल्या राज्यात शेकडो रुपयांमुळे खुनाच्या घटना घडतात असे ऐकत होतो मात्र आता बेळगाव जिल्ह्यात देखील केवळ ५ हजार रुपयांसाठी खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
ऊस तोडणीला येतो असे सांगून ५० हजार रुपये घेतले. मात्र, ऊस तोडणीला न गेल्याने ४५ हजार रुपये परत केले. केवळ पाच हजार रुपये देणे बाकी होते. त्यासाठीच बुदिहाळमधील मारुती आडव्या लढे (वय २२) या गायकाचा खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तब्बल अकरा जणांनी मिळून हा खून केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सिद्धराम सिद्धाप्पा वडेयर, आकाश कट्याप्पा पुजेरी, इराप्पा वसंत अक्कीवाटे (तिघेही रा.जोडट्टी), अजित वसंत अक्कीवाटे, मारुती वसंत अक्वीवाटे, मल्लाप्पा हालाप्पा अक्कीवाटे, हालाप्पा मल्लाप्पा अक्कीवाटे (सर्वजण रा. बुदिहाळ) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून खुनाचे धक्कादायक कारण स्पष्ट झाले.
खुनाची घटना गुरुवार १० जुलै रोजी बुदिहाळ गावाजवळ (ता. रायबाग) उघडकीस आली होती. सदर संशयितांनी मारुतीला पार्टीसाठी बोलावले. त्याच्याशी फोनवर शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे, मारुतीही संतप्त झाला व रस्त्यावर त्यांची वाट पाहू लागला.
त्यावेळी संशयित सिद्धरामसह अकराजण तेथे दाखल झाले. त्यांनी मारुतीवर हल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहावर दुचाकी चालवून तो अपघातात ठार झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न झाला. पण, मारुतीच्या कुटुंबियांनी हा अपघात नसून खून झाल्याचा संशय व्यक्त केला. रायबाग पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला असता अकराजणांनी खून केल्याचे उघडकीस आले. रामदुर्ग तालुक्यातही केवळ २,१०० रुपयांसाठी मित्राचा खून केल्याची काही महिन्यांपूर्वी घडली होती.




