बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढत असून सध्याच्या पावसात बंद दुकानांसमोरील निवाऱ्याच्या जागा कुत्र्यांच्या कळपांची आश्रयस्थाने बनवू लागली आहेत. त्यामुळे सकाळी दुकाने उघडण्यास येणाऱ्या दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कारण दुकानाचे कुलूप उघडण्याआधी त्यांना तेथे रात्रभर ठाण मांडून असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या कळपाला हिसकावून लावण्याची कसरत करावी लागत आहे.

हे करताना कांही कुत्री मुकाट जागा सोडून निघून जातात, तर कांही कुत्री आक्रमक होऊन अंगावर येत असतात. त्यामुळे बराच दुकानदारांवर सकाळी दुकान उघडण्यास जाताना दडपणाखाली जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.
तरी महापालिकेने याची दखल घेऊन रस्त्याकडेला दुकानांच्या निवाऱ्याखाली ठाण मांडून बसणाऱ्या कुत्र्यांच्या कळपांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्यासह हरातील दुकानदार आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.




